
नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर चौकात कार बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका युवकावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. या घटनेत राहुल गंभीर जखमी झाला असून, अंबाझरी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
गोकुळपेठ येथील शिवानी कनौजिया या पती राहुल आणि मुलासह तेलंगखेडी मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतत होत्या. रामनगर चौकात रस्त्याच्या मधोमध एका कारमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. राहुल यांनी हॉर्न वाजवत कार बाजूला घेण्यास सांगितले. यावरून कारमधील तीन युवकांनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली.
काही वेळातच वाद विकोपाला गेला. आरोपींनी कारमधून लोखंडी रॉड बाहेर काढून राहुल यांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी जखमी राहुल यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
शिवानी यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी गोळीबार चौक परिसरातील प्रिन्स भानुसे आणि पुष्कर शर्मा यांना अटक केली. घटनेच्या वेळी दोन्ही आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
रामनगर चौक परिसरात मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणे आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. परिसरातील कथित अवैध हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासह पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.



