Published On : Sat, Nov 4th, 2017

Video: नाना पाटेकर यांनी माहित नाही त्या गोष्टीमध्ये चोमडेपणा करणं बंद करावं – राज ठाकरे


मुंबई: फेरीवाल्यांवरील कारवाई चुकीची असल्याच्या वक्तव्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले. माहित नसलेल्या गोष्टींमध्ये नानाने चोंबडेपणा बंद करावा, अशी सणसणीत टीका राज ठाकरे यांनी केली. अनधिकृत फेरीवाले, परप्रांतीयांच्या मुद्यावर आक्रमक होणार असल्याचे स्पष्ट संकेत राज ठाकरे यांनी दिले.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. महात्मा नाना पाटेकर असा उपरोधिक उल्लेख करत राज यांनी नाना पाटेकरांवर निशाणा साधला. नाना पाटेकर उत्तम अभिनेते आहेत, पण रस्त्यावर काय करायचे हे नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये. माहित नसलेल्या गोष्टीत चोंबडेपणा करु नये. आम्ही रस्त्यावर काय करावे हे सांगू नये असेही राज यांनी नाना पाटेकरांना सुनावले. पाण्याचा प्रश्नही सरकारने सोडवणे अपेक्षित आहे. मग नानाने नाम संस्था कशाला काढली असा सवाल उपस्थित करत मराठी चित्रपटांना स्क्रिन मिळत नव्हती, तेव्हा नाना पाटेकर बोलल्याचं आठवत नाही असा टोलाही राज यांनी लगावला. ‘वेलकम चित्रपटात नाना पाटेकर यांनी फेरीवाल्याचा अभिनय केला होता. त्यामुळेच नानाला फेरीवाल्यांचा पुळका आला असावा असेही राज यांनी म्हटले.

फेरीवाल्यांच्या मुद्यावर राज यांनी आक्रमक भूमिका मांडली. पहिला अधिकार मराठी माणासाचा असून परप्रांतीयांचा पुळका कशाला असा प्रश्न उपस्थित केला. प्रशासन जर कारवाई करत नसेल तर आमचा हात उचलला जाणार असेही राज यांनी स्पष्ट केले. प्रत्येक राज्य आपल्या लोकांसाठी काम करत असतं मात्र, आमच्याकडे असे काहीच नाही असेच सांगत फेरीवाल्यांच्या मुद्यावर मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाचे राज यांनी स्वागत करत हायकोर्टाचे आभार मानले. आगामी दिवसांमध्ये फेरीवाल्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर, स्टेशन मास्तर यांना देण्याचे आवाहन त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना केले. यापुढेही हायकोर्टाच्या आदेशानंतर फेरीवाले बसले तर संबंधितांवर कोर्टाचा अवमान केल्याची केस टाकणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. महाराष्ट्रासाठी जागता पहारा देणे हे आमचे काम असून आज हात जोडून बोलतोय. मला हात सोडायला लावू नये असा इशाराही राज यांनी दिला. अनधिकृत फेरीवाल्यांकडून भाजी घेणे बंद करण्याचे आवाहन राज यांनी केले.

दरम्यान, भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या, पोलीस केसेस पडल्या त्या सर्वांचे अभिनंदन केले. मराठी माणसांसाठी आम्ही कितीही केसेस घेऊ असेही राज ठाकरेंनी सांगितले. आम्ही नेहमी पोलिसांची बाजू घेतली आहे आणि यापुढेही घेत राहू पण त्यांनीही कधीतरी आम्हाला डोळा मारावा असे म्हणत राज यांनी पोलिसांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.