
मुंबई -राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असल्याने सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अनेक प्रभागांमध्ये बिनविरोध उमेदवार निवडून येण्यावरून भाजपवर टीका केली जात आहे, मात्र ही टीका तथ्यहीन आहे. “फक्त भाजपचेच उमेदवार बिनविरोध निवडून आले, असे म्हणणे चुकीचे आहे. अपक्ष आणि इतर पक्षांचेही उमेदवार निवडून आले आहेत. अनेक ठिकाणी विरोधकांना उमेदवारच सापडले नाहीत,” असे त्यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवलीचे उदाहरण देत ते म्हणाले, “मागील वेळी आमचे १०५ नगरसेवक निवडून आले होते. यावेळी आमची ताकद आणखी वाढली आहे. विरोधकांकडे नेतृत्वच उरलेले नाही.”
ठाकरे बंधूंच्या युतीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, भाजप आणि मनसे यांच्यात वैचारिक जुळवाजुळव होऊ शकली नाही. “आम्ही तीन पक्षांची आघाडी आहोत, आमच्याकडे जागा नाही, हे एक कारण आहेच. पण जेव्हा ते आमच्याजवळ होते, तेव्हा त्यांनी हिंदुत्व स्वीकारले होते. आता त्यांनी ती भूमिका सोडली आहे. मराठी माणसाबद्दल बोलणे योग्य आहे, पण हिंसक भाष्य आम्हाला मान्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय निरीक्षक म्हणून बोलताना फडणवीसांनी थेट भाकीत करत सांगितले की, “या युतीचा सर्वात मोठा फटका राज ठाकरेंनाच बसेल.” ठाकरे बंधू एकत्र येऊन नेमके काय साध्य करणार, असा सवाल उपस्थित करत त्यांनी टोला लगावला.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, भाजपने आघाडी केल्यानंतर अनेक महापालिकांमध्ये निवडणूक एकतर्फी झाली. “जर विरोधक उमेदवारच उभे करत नसतील, तर आम्ही त्यांच्या जागी उमेदवार उभे करायचे का? लोकसभेतही अनेक खासदार बिनविरोध निवडून गेले आहेत, मग महापालिकेत तसे का होऊ शकत नाही?” असा सवाल त्यांनी केला.
प्रचाराबाबत टीका करत फडणवीस म्हणाले की, मुंबई-नाशिकच्या बाहेर जाऊन विरोधी नेत्यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलेले दिसत नाही. “हरलो तर ब्रँड संपेल, या भीतीनेच ते घराबाहेर पडले नाहीत. दोघे एकत्र आले, पण त्यातून काय साध्य झाले?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.








