Published On : Fri, May 4th, 2018

मोदींसाठी आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करायचा का? – राज ठाकरे

Advertisement

ठाणे : गेल्या काही निवडणुकांमध्ये पक्षाचा झालेला पराभव आणि संघटनेत झालेली फुटाफूट सावरण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. ते काल जिल्हयातील शहापूर येथे आले असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलीच टीका केली.
केंद्र सरकार सध्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वे निर्माण करत आहे. मात्र, हे दोन्ही प्रकल्प महाराष्ट्र आणि देशाच्या कुठल्याही उपयोगाचे नाहीत. मग, काय एकट्या नरेंद्र मोदींसाठी आपण कर्ज डोक्यावर घ्यायचे का, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.

यावेळी पत्रकारांशी बोलतांना ठाकरे म्हणाले की,कुठल्याही प्रकल्पाचा प्रस्ताव आला की, आधी त्याला विरोध दर्शवायचा. विरोध झाला की, त्या प्रकल्पाची किंमत आपोआप वाढते. मग, तेथे राजकीय लोकांची ढवळाढवळ आणि दलाली सुरू होते. या प्रकल्पासाठी जमीन देण्यास एखादाच शेतकरी गेला की, त्याला कमी मोबदला दिला जातो. मात्र, तीच जमीन मग राजकीय दलालामार्फत दिल्यास तिला मोठा मोबदला मिळतो. अशा प्रकारे राजकीय दलाली करून पैसे कमवायचे, पैसा आला की सत्ता मिळवायची आणि सत्ता आल्यानंतर पुन्हा पैसे कमवायचे, असाच सारा प्रकार सुरू आहे. दरम्यान, त्यांनी नाणार प्रकल्पाबाबतही आपले मत व्यक्त करण्यास टाळाटाळ केली. रत्नागिरीत होऊ घातलेल्या नाणार प्रकल्पाबाबत अजूनही निश्चित भूमिका घेता येत नसल्याबद्दल त्यांनी शिवसेनेवर केवळ टीका करत वेळ मारून घेतली.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज ठाकरे यांनी पालघर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांत मंगळवारपासून दौरा सुरू केला. बुधवारी ते शहापुरात होते. मनसेचे तालुकाध्यक्ष जयवंत मांजे यांच्या नेतृत्वाखाली बाइक रॅली काढून मनसेतर्फे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. रॅली बाजारपेठेत आल्यानंतर मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.