Published On : Wed, Jun 6th, 2018

पवार, ठाकरे पुन्हा येणार एका मंचावर

मुंबई : काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या कार्यक्रमादरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची महामुलाखत घेतली होती. त्यानंतर परत एकदा शरद पवार आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसणार आहेत. ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच १३ जूनपासून मुलुंडमध्ये आयोजन करण्यात आलं आहे.

या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला या दोन्ही नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते नाट्यसंमेलनाचे उद्घाटन होणार आहे. तर शरद पवार आणि राज ठाकरे या सोहळ्यातील प्रमुख पाहुणे असतील. तर 15 जूनला होणाऱ्या संमेलनाच्या समारोपाला उद्धव ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

या माध्यमातून आयोजकांनी महत्त्वाच्या राजकीय नेत्यांना आणि रंगकर्मींना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वीच संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांनी कृष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरे यांना संमेलनासाठी निमंत्रित केले होते.

तर प्रसाद कांबळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. तेव्हा उद्धव ठाकरेंनी तत्काळ हे निमंत्रण स्वीकारून समारोप कार्यक्रमाला येण्याचे मान्य करत मुलुंडच्या ९८व्या नाट्यसंमेलनाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे आता नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय फटकेबाजी रंगणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.