Published On : Tue, Jul 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

मुंबईत धक्कादायक घटना;राजभवनातील ड्युटीदरम्यान जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Advertisement


मुंबई : राज्यपालांच्या अधिकृत निवासस्थान असलेल्या राजभवन परिसरात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. ड्युटीवर असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) एका जवानाने स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याने राजभवन परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास मलबार हिल पोलिसांकडून सुरू असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मृत जवानाची ओळख कौस्तुभ सांगळे अशी झाली आहे. ते एसआरपीएफमध्ये पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत होते. मूळचे नाशिक येथील असलेले कौस्तुभ हे कोल्हापूर येथील एसआरपीएफ ग्रुप-१६ मध्ये नियुक्त होते. सध्या त्यांची राजभवनातील सुरक्षेसाठी नियुक्ती करण्यात आली होती.

माहितीनुसार, कौस्तुभ सोमवारी नेहमीप्रमाणे ड्युटीवर हजर झाले होते. राजभवन परिसरातील लोकभवन येथे सुरक्षा कर्तव्य बजावत असताना त्यांनी अचानक स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धावले. मात्र, गंभीर दुखापत आणि अतिरक्तस्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मलबार हिल पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवला. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्राथमिक तपासात कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण काय होते, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.