Published On : Sat, Jul 27th, 2019

‘रेन वाटर हार्वेस्टिंग’बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्यक

– महापौर नंदा जिचकार : तज्ज्ञ जाणकार व स्वयंसेवी संस्थांची मनपामध्ये बैठक

नागपूर : शहरात उद्भवलेली पाणी टंचाई ही गंभीर बाब आहे. भविष्याच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा असून याबाबत आताच प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे. पाण्याचा अवास्तव वापर आणि आपली रोजची सवय याचा फटका आज आपल्याला बसत आहे. भविष्यात ही समस्या उद्भवू नये यासाठी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे ही गरज झाली आहे. ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ प्रणाली प्रत्येक सरकारी कार्यालय,खेळाचे मैदान, उद्यान, मोठ्या इमारती यासोबतच नागरिकांनी आपल्या घरीही लावावी यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ संदर्भात चर्चा करून सूचना व नवसंकल्पना मागविण्यासाठी शुक्रवारी (ता.२६) महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत जज्ज्ञ जाणकार व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित बैठकीत विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे, जलप्रदाय समिती सभापती विजय(पिंटु) झलके, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, लक्ष्मी नगर झोन सभापती प्रकाश भोयर, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, हनुमान नगर झोन सभापती माधुरी ठाकरे, धंतोली झोन सभापती लता काडगाये,गांधीबाग झोन सभापती वंदना येंगटवार,सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे,आसीनगर झोन सभापती विरंका भिवगडे,मंगळवारी झोन सभापती गार्गी चोपरा,नगरसेवक संजय बंगाले, मनोज सांगोळे,उपायुक्त राजेश मोहिते, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक संचालक नगर रचना प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता (स्लम)राजेंद्र रहाटे, सहायक आयुक्त सुभाष जयदेव,राजू भिवगडे, स्मार्ट सिटीचे देवेंद्र महाजन,नागपूर सुधार प्रन्यासचे कार्यकारी अभियंता पी.पी. धनकर यांच्यासह आर्किटेक्ट, ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’बाबातचे तज्ज्ञ जाणकार व विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ बाबतच्या तज्ज्ञांनी या प्रणालीची आवश्यकता आणि त्याच्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. तर स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी पाणी बचतीबाबतच्या आपल्या विविध संकल्पना व सूचना महापौरांकडे सादर केल्या.

‘सेव्ह वाटर, हार्वेस्ट वाटर’ समिती होणार गठीत
महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, पावसाच्या पाण्याचे संचय करणे ही काळाची गरज असून यासाठी ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’चे कार्य सर्वांनी हाती घेणे आवश्यक आहे. कोणत्याही इमारतीचे बांधकाम अथवा परिसराचा विकास करताना छतावरील पाण्याचे संचय करण्याची शहराच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये तरतूद आहे. मात्र याला विकासक,नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही.जलसंवर्धन हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ ही चळवळ होणे आवश्यक आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी. नागरिकांना ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’चे महत्व पटवून देण्यात यावे.यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘सेव्ह वाटर, हार्वेस्ट वाटर’ समिती गठीत करण्यात येणार असून जनजागृतीसाठीही विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले.

नागपूर महानगरपालिका जलसंवर्धनाबाबत कार्यरत असून महापौरांनी सर्व नगरसेवकांकडून ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ प्रणाली लावण्याबातचे प्रस्ताव मागविले आहेत. विशेष म्हणजे, या कार्यासाठी महापौर नंदा जिचकार महापौर निधीही देणार आहेत.

मान्यवरांनी सुचविल्या संकल्पना
पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी व भूजल पातळी वाढविण्यासाठी बैठकीत उपस्थित मान्यवरांनी यावेळी विविध संकल्पना सुचविल्या. स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर यांनी ‘रेन वाटर हार्वेस्टिंग’ सिस्टीम न लावणा-यांच्या संपत्ती करा वाढ करण्याचे सूचविले. तर जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटु) झलके यांनी ‘रेन वाटर हार्वेस्टिंग सिस्टीम’ लावण्याच्या नगर रचना विभागाच्या नियमांमध्ये दुरुस्ती करण्याची सुचना दिली.सिस्टीमबाबत जनतेला सहजरित्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर यांनी सुचविले.

बैठकीत रोहित देशपांडे यांनी पाणी बिलासह‘रेन वाटर हार्वेस्टिंग सिस्टीम’ लावण्याचा नकाशा देणे व रस्त्यावर जमा होणा-या पाण्याचाही वापर भूजल स्तर वाढविण्यासाठी करण्याचे सुचविले. स्मार्ट सिटीचे अधिकारी डॉ. देवेंद्र गावंडे यांनी विशेषज्ज्ञांच्या मदतीने विशेष डिझाईन तयार करण्याचा सल्ला दिला.लायन्स क्लबचे पूर्व प्रांतपाल विनोद वर्मा यांनी क्लबच्या माध्यमातून भूजल स्तर वाढविण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. लीना बुधे यांनी या प्रणालीबाबत नागरिकांमध्ये योग्य जनजागृती करण्याची मागणी केली. ग्रीन व्‍हिजील फाउंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी यांनी आंघोळ,भांडी व कपडे धुतलेल्या पाण्याचा पुनर्वापर शौचालयात फ्लशसाठी करण्याचे सुचविले.अभिषेक शर्मा यांनी जपानी तंत्रज्ञानाची माहिती दिली.

बैठकीत प्रभात धडीवाल, मनोज लेंडे, मनोज संगवार, उज्वल धनविजय, श्रीकांत देशपांडे,श्रीकांत वाईकर, रवींद्र नागपूरे, प्रशांत सातपुते,सुरभी जैस्वाल, विजय बालकोटे आदी उपस्थित होते.