नागपूर: विदर्भात सप्टेंबरच्या पहिल्या दिवसापासून परतलेल्या पावसाने जोरदार आगमन केले असून सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने चंद्रपूर जिल्ह्याला चांगलेच झोडपले. मंगळवारी सकाळपर्यंत येथे तब्बल 115 मिमी पावसाची नोंद झाली.
या मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले, रस्ते पाण्याखाली गेले आणि अनेक गावांचा संपर्क तुटला. पडोलीतील आमटा वॉर्ड परिसरात जवळपास २५० घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वरोरा-अर्जुनी, धानोरा-भोयगाव, गुंजाळा-कचराळा आदी मार्ग बंद पडले आहेत. ब्रम्हपुरी शहरातही ८२.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
इरई धरणातील पाणीस्तर वाढल्याने मंगळवारी सकाळी सातपासून धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला. तीन गेट्स एक मीटरने व चार गेट्स ०.७५ मीटरने उघडल्याने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, भंडाऱ्यात ६८ मिमी, नागपूरमध्ये ३० मिमी, गडचिरोलीत १७ मिमी पावसाची नोंद झाली. नागपूरच्या पारशिवनीत आणि गडचिरोलीच्या अहेरीत मुसळधार पाऊस कोसळला. पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि बुलढाण्यातही दमदार सरी बरसल्या.
वाशिम जिल्ह्यात ‘ओला दुष्काळा’ची स्थिती-
वाशिम जिल्ह्यात सोमवार रात्रीपासून सलग पावसामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. आठ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून मालेगाव तालुक्यात सर्वाधिक ६४.३ मिमी पाऊस पडला. सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
पुढील तीन दिवस यलो अलर्ट-
हवामान विभागाने ५ सप्टेंबरपर्यंत विदर्भभर विजांसह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यासाठी बुधवारी पुन्हा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.