नागपूर : महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं. 17 ते 21 ऑगस्टदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावे पुराच्या पाण्यात सापडली. गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि मुंबईत जोरदार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय घाटमाथ्याच्या भागातही अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे. कोकणाला पाच दिवसांचा यलो अलर्ट देण्यात आला असून काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
फक्त कोकणच नव्हे तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वीही विदर्भात पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. आता पुन्हा तिथे पावसाची शक्यता वर्तवल्याने चिंतेचे वातावरण आहे.
महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांतही जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर संपूर्ण देशात वाढण्याची शक्यता आहे. आधीच पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, आणखी पावसाचा फटका बसल्यास परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.