नागपूर : शहरात बुधवारी आणि गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मध्यरात्रीच्या सुमारास तुफान वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. शहरातील अनेक भागात पाणी साचले तर काही वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले.
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार गेल्या 24 तासात 164 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.यापूर्वी 1994 मध्ये जुलै महिन्यात 303 मिमी पाऊस पडला होता.
नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.नागपूर विमानतळ येथे 164 मिमी पावसाची नोंद झाली आहे तर, पारडी या भागात 179.7 मिमी आणि सीताबर्डी भागात 177.4 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे.
पूर्व नागपुरात नागनदी भरल्याने शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. अनेक झोपडपट्टींमध्ये पाणी शिरल्याने पहाटे तेथील नागरिकांना शाळेत आणि समाजभवनात हलविण्यात आले आहे. तसेच शहरातील अंबाझरी तलावही ओव्हर फ्लो झाला. नंदनवन,भांडेवाडी ,पारडी, वाठोडा या भागांतील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. वस्त्याच नाही तर शहरातील अनेक अपार्टमेंटमध्येही पाणी साचले.हवामान खात्याच्या अंदाजानुसार शहरात आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे.