मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांना एक झटका दिला आहे. १ जुलैपासून देशभरात मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या तिकीट दरात किरकोळ वाढ करण्यात आली आहे. जरी प्रती किलोमीटर वाढ फारशी मोठी नसली, तरी दीर्घ अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर याचा थेट परिणाम होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही दरवाढ मुख्यतः इंधन, देखभाल खर्च आणि एकूण ऑपरेशनल खर्च वाढल्यामुळे करण्यात आली आहे. या भाडेवाढीचा परिणाम फक्त ५०० किलोमीटरहून अधिक अंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे. सामान्य दुसऱ्या वर्गासाठी प्रति किलोमीटर ०.५० पैसे, नॉन-एसी मेल/एक्सप्रेससाठी १ पैसा, तर एसी डब्यांसाठी २ पैसे प्रती किलोमीटर दरवाढ लागू करण्यात आली आहे.
उदाहरणार्थ, जर एखादा प्रवासी १,००० किलोमीटर नॉन-एसी मेल गाडीने प्रवास करतो, तर त्याला १० रुपये जास्त मोजावे लागतील. एसी डब्यांमध्ये याच अंतरासाठी २० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.
यामध्ये स्थानिक ट्रेन प्रवासी आणि मासिक पासधारकांना कोणताही अतिरिक्त भाडा भरावा लागणार नाही. ५०० किलोमीटरपर्यंतच्या प्रवासावरही कोणताही परिणाम झालेला नाही.
रेल्वे प्रशासनाचा दावा आहे की, ही वाढ अत्यंत मर्यादित असून सामान्य प्रवाशांवर फारसा भार पडणार नाही. मात्र, यामुळे लांब पल्ल्याचा वारंवार प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.