रायगड : ईर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून किमान ४० ते ५० घरं मलब्याखाली आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी पाऊस चालू असल्यामुळे एनडीआरएफच्या बचाव पथकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
या ठिकाणी रात्री २.३० वाजता बचावकार्य करीत असताना नवी मुंबई महानगरपालिकेचे बेलापूर येथील अग्निशमन विभागातील सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपले कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाल्याने दुःख व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. दरड रहिवासी घरांवर कोसळली आहे.
या ठिकाणी आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत.यामध्ये १०० हून अधिक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर बचाव कार्य करण्यासाठी नवी मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री २.३०च्या सुमारास त्यांनी बचाव कार्य सुरु केले. बचाव कार्यादरम्यान नवी मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी शिवराम ढुमणे यांना जीव गमवावा लागला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने या अधिकाऱ्याच्या मृत्यू झाल्याची माहिती आहे.











