नागपूर: गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (SSB) सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी, १५ मे रोजी दुपारी ३ ते ४.५० या वेळेत बेकायदेशीर कल्याण मटका सट्टा अड्ड्यावर धाड टाकून एकाला अटक केली आहे. सदर कारवाई सहकार नगर बस स्टॉपजवळील हवेली पान शॉप समोर करण्यात आली.
ममतेश उर्फ गोलू राम लखन शंभरकर (वय ३५, रा. जुनी खंबाळा वसाहत, पो.स्टे. राणा प्रताप नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
जप्त करण्यात आलेली सामग्री-
कल्याण मटका सट्ट्यासाठी वापरले जाणारे नंबर असलेले कागद
रोकड ₹३,७००
काळा बॉलपेन (सुमारे ₹५ किंमत)
स्काय ब्लू रंगाचा ओप्पो १५ मोबाईल फोन
हुंडई व्हर्ना कार (MH 40 AC 9189) – अंदाजे १०,००,००० किमतीची
एकूण जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत १०,०८,७०५ रुपये इतकी आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ममतेश हा स्थानिक नागरिकांकडून कल्याण मटक्यासाठी पैसे घेताना व नंबर लिहिताना रंगेहाथ पकडण्यात आला. त्याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या छाप्यात महिला पोलीस हवालदार आरती, नापो शेषराव, पोलीस शिपाई अश्विन, समीर आणि कुणाल यांनी सहभाग घेतला.