नागपूर : मतदारयादीतील गैरव्यवहारांच्या आरोपावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मांडण्याची घोषणा केली आहे. विरोधकांच्या या हालचालीमुळे राजकीय वातावरण तापले असून, राज्याचे महसूलमंत्री व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
मंगळवारी नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले,
“राहुल गांधी फक्त नाटक करत आहेत. काँग्रेसचा पाया हादरू लागल्याने स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी ते खोट्या आरोपांचा आधार घेत आहेत. निवडणूक आयोगाने संपूर्ण चौकशी केली आहे. आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय घेणे हे अन्यायकारक आहे.”
ते पुढे म्हणाले,विपक्ष झोपल्याचे नाटक करत आहे. राहुल गांधींना कितीही जागं करण्याचा प्रयत्न केला तरी ते उठणार नाहीत, कारण ते वास्तवाला सामोरे जाण्यास घाबरत आहेत. निवडणूक आयोगावर आरोप करून ते केवळ काँग्रेसला वाचवण्याची धडपड करत आहेत,” असा घणाघाती आरोप बावनकुळे यांनी केला.