Published On : Wed, Jun 13th, 2018

राहुल गांधींनी खोब्रागडे कुटूंबियांच्या घरी जावून केले सांत्वन

चंद्रपूर : महाराष्ट्र भूषण तसेच एचएमटी धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या कुंटूंबियांची काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी भेट घेतली. आज नागभीड तालुक्यातील नांदेड गावतल्या खोब्रागडे यांच्या राहत्या घरी भेट देत राहुल गांधी यांनी खोब्रागडे कुटूंबियांचे सांत्वन केले. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत आणि खा. अशोक चव्हाण उपस्थित होते.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची ही नियोजीत भेट होती. राहुल गांधी बुधवारी १३ जूनला खोब्रागडे कुटूंबियांची भेट घेणार असल्याचे यापूर्वीच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. त्यानुसार आज राहुल गांधी खोब्रागडे कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी राहुल गांधी यांनी स्थानिक शेतकऱ्यांशीही संवाद साधला. काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत आणि खासदार अशोक चव्हाण यांचीही यावेळी उपस्थिती होती.

फोर्ब्सलाही आपल्या कृषी संशोधनाची दखल घ्यायला भाग पाडणारे एचएमटी तांदूळ तसेच इतर ८ वाणाचे जनक दादाजी खोब्रागडे यांचे प्रदीर्घ आजाराने रविवारी ३ जूनला निधन झाले होते. नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी खोब्रागडे यांनी ८० च्या दशकापासून धानाच्या विविध जाती विकसीत केल्या.

एचएमटी सारख्या लोकप्रिय वाणही त्यांनीच विकसीत केले. ज्यामुळे त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळाली. दरम्यान, राहुल गांधी यांना भेटणाऱ्या अनेक नेत्यांची नावे एसपीजीने सुरक्षेच्या कारणावरून वगळली आहेत. त्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.