Published On : Sun, Nov 29th, 2020

पूर्ती सिंचन समृध्दी कल्याणकारी संस्थेला जागतिक जलसंवर्धन पुरस्कार घोषित

-ना. गडकरींनी केले ‘जल ही जीवन’ टीमचे अभिनंदन
-येत्या 16 डिसेंबरला पुरस्कार प्रदान करणार

नागपूर: ग्रामीण क्षेत्राच्या विकासाचा ध्यास असलेले विकासपुरुष केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी व प्रसिध्द समाजसेवी भैयासाहेब मुंडले यांनी स्थापन केलेल्या पूर्ती सिंचन समृध्दी कल्याणकारी संस्थेला जागतिक ऊर्जा व पर्यावरण प्रतिष्ठान नवी दिल्ली तर्फे जागतिक जलसंवर्धन पुरस्कार घोषित केला आहे. पुरस्कार वितरण येत्या 16 डिसेंबरला करण्यात येणार आहे. यशस्वी झालेला हा जलसंधारणाचा पॅटर्न केंद्र शासनाच्या नीती आयोगानेही स्वीकारला असून तो देशभर राबविण्याचा निर्णय घेतला हे येथे उल्लेखनीय.

भूजल ही देशातील 80 टक्के लोकांची गरज आहे. ते एक अदृश्य संसाधन आहे. पावसाचे पाणी हा एकमेव स्रोत असून त्याचे संवर्धन आणि पुनर्भरण आवश्यक ठरते. याच विचारातून ना. नितीन गडकरी आणि प्रभाकरराव मुंडले यांनी पूर्ती सिंचन समृध्दी कल्याणकारी संस्थेतर्फे पुढाकार घेऊन एक पथदर्शी प्रकल्प विदर्भात प्रस्थापित करण्याचा संकल्प टीम जल ही जीवनतर्फे करण्यात आला. यासाठी वर्धा तालुक्यातील सेलू तालुक्याअंतर्गत मृतप्राय असलेल्या 12 किमी लांबीचा तामसवाडा नाला निवडण्यात आला. मौजा तामसवाडा हे आदिवासीबहुल गाव आहे.

यानंतर तामसवाड्याचे सर्वेक्षण करण्यात आले. ग्रामस्थ, शेतकर्‍यांना नियोजित कामाची माहिती देण्यात आली. या कामामुळे शेतकर्‍यांना कसे पाणी मिळेल, पाण्याचे स्रोत कसे जलमय होतील अशा परिणामांची माहिती देण्यात आली. गावात ज्येष्ठ नागरिकांच्या शिवारफेरी काढून नाल्याचे उगमस्थान निश्चित करण्यात आले. शेतकर्‍यांनी, ग्रामस्थांनी मार्च 2011 मध्ये या प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाचा पाठपुरावा व समन्वयासाठी जबाबदारी पूर्ती सिंचन समृध्दीतर्फे अभियंता म्हणून माधव कोटस्थाने यांनी घेतली. आणि कामाची सुरुवात झाली.

हा प्रकल्प पूर्ण झाला आणि हजारो हेक्टर जमिनीचे या नाल्याच्या पाण्यामुळे सिंचन होऊ लागले. पिण्याच्या पाण्याचे स्रोत जलमय झाले. ऐन उन्हाळ्यातही शेतकर्‍यांना आणि गावकर्‍यांना पाणी उपलब्ध झाले. पाणीटंचाईची समस्या संपुष्टात आली. गेल्या 20 वर्षांपासून संस्था करीत असलेल्या प्रामाणिक आणि प्रत्यक्ष कार्याची पावती ऊर्जा व पर्यावरण प्रतिष्ठानने या संस्थेला दिली. जल ही जीवनचे सर्व सदस्य यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे, अशी भावना ना. गडकरी यांनी व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन केले.


आज सकाळी जल ही जीवनच्या चमूने केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. याप्रसंगी या तामसवाडा प्रकल्पाचे समन्वयक माधव कोटस्थाने यांचे पुष्पगुच्छ देऊन ना. गडकरी यांनी अभिनंदन केले. यावेळी प्रफुल्लदत्त जामदार, राणा विरेंद्र रणनवरे, मिलिंद भेंडे, विकास तोतडे, रमेश मानकर, मनोज तरारे, रवींद्र काळी, अरविंद कोकाटे, नंदकिशोर गावंडे, भीमराव लांडगे, सत्यजित जांभुळकर, मिलिंद भगत, अमित गोमासे, राजेंद्र देशकर, ज्ञानेश्वर चन्ने, शिरीष कुळकर्णी, नितीन महाजन, विजय घोटोळे, विजय घुगे, पी. के. जैन आदी उपस्थित होते.