Published On : Tue, May 29th, 2018

गीतांजली एक्स्प्रेसमधून १२ लाखांची पर्स पळविली

नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी उभी असताना शौचालयात गेलेल्या महिलेचे दागिने आणि रोख रक्कम असलेली १२ लाख ८५ हजार रुपयांची पर्स अज्ञात आरोपीने पळविल्याची घटना प्लॅटफार्म क्रमांक ३ वर सोमवारी सकाळी ८ वाजता घडली.

हेमलता अग्रवाल (४५) रा. अंधेरी ईस्ट, नवी मुंबई या आपल्या कुटुंबासह रेल्वेगाडी क्रमांक १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेसच्या कोच ए-२, बर्थ ९, ११ आणि १२ वरून बिलासपूर ते मुंबई असा प्रवास करीत होती. सोमवारी सकाळी ८ वाजता गीतांजली एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ३ वर थांबली. यावेळी ही महिला शौचालयात गेली. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने संबंधित महिलेची पर्स पळविली.

पर्समध्ये डायमंडच्या बांगड्या, दोन अंगठ्या, सोन्याची चेन, दोन कानातले रिंग, ब्रासलेट, सोन्याचा सेट, आयफोन आणि रोख ५० हजार असा एकूण १२ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल होता. संबंधित महिलेने चोरीची तक्रार लोहमार्ग पोलिसांना दिल्यानंतर रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. पुढील तपास लोहमार्ग पोलीस करीत आहेत.