Published On : Tue, May 29th, 2018

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर इतिहासकारांनी अन्याय केला, ‘मोपल्यांच्या बंडावर’ इतिहास गप्प – डॉ. सत्यपाल सिंग

नागपूर : “स्वातंत्र्यवीर सावरकरांवर इतिहासकारांनी अन्याय केला आहे. त्यांच्याविषयी चुकीची भावना व गैरसमज निर्माण केले गेले. केरळमध्ये झालेल्या हजारो हिंदूंच्या कत्तलीवर सावरकरांनी ‘मोपल्यांचे बंड’ हे पुस्तक लिहिले होते. मात्र भारताचा इतिहास याविषयी बोलत नाही”, असा विषाद केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी व्यक्त केला. स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या १३५ जयंतीनिमित्त स्वा. सावरकर स्मारक समितीतर्फे आयोजित सामाजिक अभिसरण व तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

सत्यपाल सिंग म्हणाले की, सावरकरांनी जातीयतेचा विरोध केला. त्यांनी देशाच्या एकात्मतेसाठी व एका सुदृढ समाजाच्या निर्माणासाठी आंतरजातीय विवाहाचे समर्थन केले होते. परंतु आपण आजही जातीयतेमध्ये जगत आहोत. त्यांनी उदाहरण देताना सांगितले की, “माझ्या मुलांच्या कोणत्याही प्रमाणपत्रावर जातीचा उल्लेख नाही. पण मी पोलिसांत असल्याने माझ्या मुलांना शाळेत प्रवेश मिळाला. परंतु आठव्या वर्गात असताना शिक्षकांनी तिला जात विचारली. परंतु तिला सांगता आले नाही. तिने आपल्या आईला विचारले. त्यानंतर तिने याबद्दल मला विचारण्यास मुलीला सांगितले.”

सिंग म्हणाले की, एकीकडे आमच्यापैकी अनेक पुढारी जातीयता निर्मूलनाविषयी मोठमोठ्या बाता मारतात व दुसरीकडे जातीच्या आधारावर आरक्षणाची मागणी करतात. हाच विरोधाभास आहे. एक सुशिक्षित नागरिक आणि एक गुंड-मवाली यांच्या मताची किंमत आपल्या लोकशाहीत समान आहे. हे कुठेतरी बदलायला हवे. याविषयी मी संसदेत सुद्धा बोललो, असे सत्यपाल सिंग यांनी सांगितले.

विद्यार्थी जीवनापासून आदिवासी घटकांसाठी समाजकार्य आणि त्यानंतर सावरकरांच्या विचारसरणी प्रमाणे आंतरजातीय विवाह केल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील देवरी मतदारसंघाचे आमदार संजय पुराम आणि त्यांच्या पत्नी सविता पुराम यांना प्रमुख अतिथी डॉ. सत्यपाल सिंग आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याहस्ते पुष्पगुच्छ, शाल, सावरकरांची अर्धप्रतिमा आणि ५ हजार रुपये रोख देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे आशादीप अपंग महिला व बालविकास संस्थेच्या माध्यमातून महिला व बालकांच्या उत्थानासाठी प्रयत्नरत असणाऱ्या डॉ. प्रतिमाताई शास्त्री यांचा तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वा. स्वातंत्र्यवीर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे होते. तर कार्याध्यक्ष शिरीष दामले हे देखील मंचावर उपस्थित होते.

सत्काराच्या उत्तरभाषणात आ. संजय पुराम, त्यांच्या पत्नी सविता पुराम आणि डॉ. प्रतिमा शास्त्री यांनी सावरकरांचे कार्य व विचारधारेवर प्रकाश टाकीत वैयक्तिक जीवन व सामाजिक क्षेत्रातील आपली वाटचाल विशद करताना झालेल्या सन्मानाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात सावरकर लिखित “शतजन्म शोधताना” या गीताने झाली. देवेंद्र उपगडे यांनी हे गीत गायले. प्रास्ताविक स्वा. सावरकर समितीचे सचिव डॉ. अजय कुलकर्णी यांनी केले. या सत्कार सोहळ्याला सावरकर प्रेमी नागरिक व सत्कारमूर्तींच्या आप्तजनांनी हजेरी लावली होती.

SWAPNIL BHOGEKAR