Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

  Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Sep 16th, 2020

  शहरात पुढील शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू

  जनप्रतिनिधींचे मागणीवर महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : शुक्रवारी रात्री ९.३० ते सोमवार सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांना घरातच राहण्याची विनंती

  नागपूर : झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. वारंवार आवाहन करूनही काही बेजबाबदार नागरिकांमुळे धोका निर्माण झाला आहे. अशात नागरिकांकडून आणि जनप्रतिनिधींकडूनही लॉकडाउनची मागणी होत आहे. लॉकडाउन कोरोनावरील उपाय नाही आणि सध्या प्रशासनामार्फत त्याला परवानगीही नाही. मात्र नागरिकांमध्ये जनजागृती यावी, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेउन जबाबदारीने वागावे यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत आता प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शुक्रवारी (ता.१८) रात्री ९.३० वाजतापासून ते सोमवारी (ता.२१) सकाळी ७.३० वाजतापर्यंत नागपूर शहरात जनता कर्फ्यू चे पालन करा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.

  मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभा कक्षात बुधवारी (ता.१६) झालेल्या जनप्रतिनिधींसोबतच्या बैठकीत महापौरांनी ही घोषणा केली. बैठकीत आमदार सर्वश्री नागो गाणार, गिरीश व्यास, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्षनेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.चिलकर आदी उपस्थित होते. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरात जनता कर्फ्यू लागू करावा अशी बहुतांश उपस्थित लोकप्रतिनिधींनी मागणी केली. त्यास अनुसरुन महापौरांनी याबाबत नागरिकांना आवाहन केले.

  बैठकीत प्रारंभी महापौर संदीप जोशी व सर्व पदाधिका-यांनी शहरातील रुग्णालयांची संख्या, बेड्सची संख्या, कोव्हिड केअर सेंटरची स्थिती, रुग्णवाहिका, शववाहिकांची संख्या आदींचा आढावा घेतला. यावेळी शहरात लॉकडाउन लावण्यासंदर्भात भूमिका मांडण्यात आली. लॉकडाउनसंदर्भात झालेल्या चर्चेत बोलताना आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले की, आज शहराची स्थिती पाहता लॉकडाउनची नव्हे तर सामाजिक जबाबदारीची जास्त गरज आहे. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. लॉकडाउन हा येणा-या स्थितीचा सामना करण्यासाठी करावयाच्या पूर्वतयारीचा काळ असतो. आज शहरात आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा सज्ज असून त्या वाढीसाठी दररोजच मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शहरात लॉकडाउनची गरज नसल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, नागरिकांनी फेस मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हात धुणे आवश्यक असून गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळले पाहिजे.

  शहरातील कोरोनाबाधितांचा वाढता आलेख हा चिंताजनक असला तरी मनपाद्वारे त्यादृष्टीने सुविधा निर्माण करण्याचे कार्य प्रशासकीय स्तरावर युद्धपातळीवर सुरू आहे. शहरात अनेक सुविधा आज मनपामध्ये वाढविण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सुविधांमध्येही भर पडली आहे, असे सांगतानाच महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या लॉकडाउन न लावण्यासंदर्भातील भूमिकेचे समर्थनही केले. लॉकडाउनचा निर्णय राज्यशासनाचा आहे.

  मात्र कोव्हिड संक्रमणाची जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण झाली असून त्यासाठी शहरात दोन दिवस ‘जनता कर्फ्यू’ लागू करणे आवश्यक आहे, अशी भूमिका सर्वच जनप्रतिनिधींनी यावेळी मांडली. शहरातील उपस्थिती आमदार आणि इतर जनप्रतिनिधींच्या सूचनेवरून महापौर संदीप जोशी यांनी येत्या शुक्रवारी (ता.१८) रात्री ९.३० वाजतापासून ते सोमवारी (ता.२१) सकाळी ७.३० वाजतापर्यंत नागरिकांनी काटेकोरपणे ‘जनता कर्फ्यू’चे पालन करावे, असे अवाहन केले. यानंतर पुढील शनिवारी आणि रविवारी म्हणजे २६ आणि २८ सप्टेंबरला सुद्धा याच प्रकारचे ‘जनता कर्फ्यू’ चे पालन करावे. त्यानंतर पुढे पुन्हा एकदा सर्व जनप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही महापौर यावेळी म्हणाले. ‘जनता कर्फ्यू’च्या काळात औषधी दुकाने व्यतिरिक्त कोणतिही दुकाने, आस्थापने सुरू ठेवू नये, नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच शहरातील व्यापारी वर्गानेसुध्दा स्वयंस्फुर्तीने त्यांची दुकाने व आस्थापना दोन दिवस बंद ठेऊन या मोहिमेस सहकार्य कारावे, असेही आवाहन केले आहे.

  आयुक्तांच्या नेतृत्वात आरोग्य सेवेने कात टाकली
  नागपूर महानगरपालिकेचे नवीन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पदभार स्वीकारताच शहरातील आरोग्य व्यवस्थेकडे प्राथमिकस्तरापासून लक्ष दिले. ही सुविधा सुधारून जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा लाभ मिळावा यासाठी कार्य केले आहे. त्याचेच परिणाम आज दिसून येत आहेत. आयुक्तांनी पदभार स्वीकारताच सर्वात आधी कोव्हिड चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. आज शहरात ५० कोव्हिड चाचणी केंद्र आहेत. यामध्ये सुरूवातीला ६ केंद्रांवरच ‘आरटीपीसीआर’ ही कोव्हिड चाचणी केली जायची. मात्र आता सर्वच चाचणी केंद्रांमध्ये त्याची व्यवस्था आहे. ‘अँटीजेन’ चाचणी नंतरही आवश्यक असल्यास रुग्णाची ‘आरटीपीसीआर’ चाचणी केली जाते. त्यामुळे रुग्णाचे अचूक निदान होउन लवकर उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. त्यामुळे गरोदर महिला आणि ‘हायरिस्क’मधील रुग्णांचेही निदान जलदगतीने होत आहे. आज शहरात दररोज ६५०० ते ७००० नागरिकांची कोव्हिड चाचणी होत आहे, हे उल्लेखनीय.

  मनपामध्ये कार्यभार स्वीकारताच आयुक्तांनी प्राधान्याने कोव्हिड हॉस्पीटलची संख्या वाढविण्यावर भर दिला. सुरूवातीला ७ कोव्हिड हॉस्पिटल असलेली संख्या आजघडीला ४० असून येथे ३५०० बेड्सची व्यवस्था आहे. याशिवाय इतर खाजगी रुग्णालयांमध्ये कोव्हिड रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. शहरातील सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांना मोफत उपचार मिळावे यासाठी आयुक्त राधाकृष्णन बी. कटाक्षाने लक्ष देत असून मोफत रुग्णालये सुरू करण्यावरही त्यांनी भर दिला आहे. त्याचेच फलित म्हणजे आता रेल्वेचे ६९ बेड्सचे रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. याशिवाय शहरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्षाचे शिक्षण घेणा-या २७१ एम.डी. डॉक्टरांची मनपाने थेट नियुक्ती केली आहे. या डॉक्टरांच्या नियुक्तीमुळे आता रुग्णालयांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांचे उपचार होउ शकणार आहे.

  याशिवाय रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी अपू-या पडणा-या रुग्णवाहिकांकडे लक्ष देत आयुक्तांनी त्यांची संख्या ६५ केली आहे. मृत्यूनंतर कोरोनाबाधितांचे शव तासन् तास रुग्णालयात पडून राहत असल्याची गंभीर बाब शहरात घडत असल्याने कोव्हिडचा धोका जास्तच वाढला. अशा स्थितीत आयुक्तांनी तातडीने दखल घेत ९ शववाहिकांची संख्या १९ एवढी केली आहे. मनपाच्या मिनी बसमध्ये परिवर्तन करून त्यांच्यापासून शववाहिकांची निर्मिती करण्यात आली आहे. या शववाहिकांमध्ये एकावेळी ३ शव अत्यंसंस्कारासाठी नेता येत आहेत. विशेष म्हणजे, आणखी ९ शववाहिका तयार झाल्या असून ही संख्या आता २८ एवढी झाली आहे. एकूणच एकीकडे शहराची स्थिती वाईट होत असल्याचे चित्र निर्माण होत असले तरी नागरिकांना जलदगतीने उपचार आणि प्रतिसाद मिळावा यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणेने कात टाकली आहे, हे विशेष.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145