| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Sep 26th, 2018

  सेंट्रल बाजार रोडवर ‘पौर्णिमा दिवसा’निमित्त जनजागृती

  नागपूर: ऊर्जा बचतीसाठी नागपूर महानगरपालिकेने तत्कालिन महापौर आमदार प्रा. अनिल सोले ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सहकार्याने काही वर्षांपूर्वी सुरू केलेला ‘पोर्णिमा दिवस’ उपक्रम आता नागपुरात चळवळीचे रूप घेत आहे. पोर्णिमा दिवसाचे आवाहन होताच ज्या परिसरात स्वयंसेवक जातात त्या परिसरातील व्यापारी आणि नागरिक स्वत: रात्री ८ ते ९ दरम्यान अनावश्यक विद्युत उपकरणे बंद करतात. असाच काहीसा अनुभव मंगळवारी (ता. २५) पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने आला.

  नागपूर महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक २५ सप्टेंबर रोजी रामदासपेठ परिसरातील सेंट्रल बाजार मार्गावरील कल्पना बिल्डिंग चौकात जनजागृतीसाठी पूर्वी केलेल्या आवाहनाप्रमाणे रात्री ८ वाजता पोहचले. नेहमीप्रमाणे जनजागृतीसाठी आणि पोर्णिमा दिवस उपक्रम तसेच ऊर्जा बचतीचे सांगण्यासाठी जेव्हा ग्रीन व्हिजीलचे स्वयंसेवक व्यापारी प्रतिष्ठानात जाऊ लागले तेव्हा त्यांनी या उपक्रमाविषयी कल्पना असल्याचे सांगितले. आम्ही स्वयंप्रेरणेने अनावश्यक वीज उपकरणे बंद केल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे प्रत्येक पोर्णिमा दिवसाला आम्ही किमान एक तास वीज उपकरणे बंद ठेवू, असे आश्वासन स्वयंसेवकांना दिले.

  विशेष म्हणजे, यावेळी पौर्णिमा दिवसाला नागपूर महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने परिसरातील पथदिवेही एक तासाकरिता बंद केले होते. यावेळी मनपाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जैस्वाल, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, ग्रीन व्हिजीलच्या टीम लीडर सुरभी जैस्वाल यांच्या नेतृत्वात मनपाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी वीज बचतीविषयी जनजागृती केली.

  स्वयंसेवकांनी यावेळी परिसरातील व्यापारी प्रतिष्ठान, रुग्णालये, तसेच घराघरांत जाऊन वीज बचतीचे महत्त्व सांगितले. पौर्णिमा दिवस या उपक्रमाबद्दल माहिती दिली. पौर्णिमेची रात्र ही उजेडी रात्र असते. चंद्राचा प्रकाश भरपूर असतो. हे निमित्त साधून आपल्या परिसरातील दिवे किमान एक तास बंद ठेवले तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज बचत होते, असे सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो यूनीट विजेची बचत झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये नागपुरातील या उपक्रमाचा उल्लेख केल्याची माहिती स्वयंसेवकांनी व्यापारी आणि नागरिकांना दिली. स्वयंसेवकांच्या आवाहनाला दाद देत व्यापाऱ्यांनी त्यांच्या प्रतिष्ठानातील अनावश्यक वीज दिवे रात्री ८ ते ९ या कालावधीत बंद ठेवले.

  या उपक्रमात मनपाचे सहायक अभियंता अजय मानकर, कनिष्ठ अभियंता गजेंद्र तारापुरे, राजेंद्र राठोड, सचिन फाटे, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, विष्णुदेव यादव, दादाराव मोहोड, सौरभ अंबादे व मनपाच्या विद्युत विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145