Published On : Sat, Nov 4th, 2017

वाहतुकीचे नियम पालन करण्यासाठी लोकजागृती आवश्यक : महापौर नंदा जिचकार

नागपूर: वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी लोकजागृती व लोकसहभाग आवश्यक आहे. ही लोकचळवळ व्हावी यासाठी अपघातमुक्त समिती विशेष प्रयत्न शहरात करीत आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले. गुरूवार (ता.२) महापौर कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या.

बैठकीला शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक विजय चुटेले, अपघात मुक्त समितीचे कार्याध्यक्ष राजु वाघ, महासचिव अजय डबीर, संपर्कप्रमुख संजय चिंचोले, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप येळणे, प्रा. गजानन पोटभरे, अनुसया गुप्ता, प्रा. नागेश इजमुलवार, बबनराव पडोळे, निशांत बिर्ला, प्रफुल्ल मोरे, सागर घोडमारे, प्रकाश खळतकर, बबन पटोले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, अपघातमुक्त नागपूर ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची संकल्पना आहे. त्यामुळे या संकल्पनेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. नागपूर शहराची ‘स्मार्ट सिटी’ कडे होणारी वाटचाल ही आपल्याकरिता एक अभिमानाची बाब आहे. त्याचबरोबर मानवी चुकांमुळे होणारे अपघात व अपघातामुळे होणारे कौंटुबिक आघात ही काळजीची व दु:खाची बाब आहे.

याच अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी आणि संकल्प करण्यासाठी संपूर्ण नागपूर शहरात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले. जानेवारी २०१८ मध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह पंधरवाड्यात यशवंत स्टेडियम येथे संकल्प घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

तत्पूर्वी बैठकीत सहभागी झालेल्या सदस्यांनी या अभियानात त्यांचे काय योगदान राहील, याविषयी माहिती दिली. कार्याध्यक्ष राजू वाघ यांनी अभियानाबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली.