Published On : Sat, May 27th, 2017

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्या – पांडूरंग फुंडकर

Advertisement
  • कृषी विभागाच्या योजनांचा आढावा
  • उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान


नागपूर:
खरीप हंगामासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करुन शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत तसेच खरीप हंगामासाठी आवश्यक असलेले खते बी-बियाणे, कीटकनाशके, यंत्रसामुग्री, सुलभपणे उपलब्ध होतील या दृष्टीने नियोजन करा अशा सूचना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जिल्हास्तरीय कृषी अधिकाऱ्यांना दिल्यात. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

“उन्नत शेती, समृध्द शेतकरी ” याअभियानातर्गंत कृषी पंधरवाडा तसेच खरीप हंगाम पूर्वतयारीचा आढावा कृषी मंत्री श्री. फुंडकर यांनी आज घेतला. त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रविप्रकाश दानी, एनएचएम चे संचालक एस. एस. जाधव, विजय इंगळे, आत्म्याचे संचालक सुभाष खेमनार, विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या गोपीनाथ मुंडे कृषी अपघात विमामध्ये विमा कंपन्यांकडून येत असलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन सचिव स्तरावरुन यावर नियंत्रण ठेवण्‍याचे सांगतांना श्री. फुंडकर ते म्हणाले की, अपघात विमा तसेच पीक विमा योजनांसाठी विमा कंपन्यांच्या स्थानिक प्रतिनिधीवर अधिकाऱ्यांनी दबाव आणणे आवश्यक असून, विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन त्याचा अहवाल पाठवण्याचे आदेश यावेळी कृषी अधिकाऱ्यांना दिले.

खरीप हंगामातील पिकांच्या सिंचनासोबतच जलसंधारण आणि जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून शेतात झालेल्या कामांची माहिती त्यांनी यावेळी घेतली. मागेल त्याला शेततळे, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, खरीप हंगामातील नियोजन, भात, तूर, कापूस तसेच सोयाबिन आंतरपिकांचे क्षेत्र वाढविणे, बिजप्रक्रिया, बियाण्यांतील अंकुरणक्षमता वाढीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे, एकात्मिक कीड व्यवस्थापन, तणनाशक, जलसंधारणाचा वापर, संरक्षित ओलितामध्ये शेततळी, विहीरी, सूक्ष्म जलसिंचन पध्दतीद्वारेही कृषीची उत्पादकता वाढविण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

पिकांचे प्रत्यक्ष क्षेत्र वाढविण्यासोबतच उन्नत शेती समृध्द शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे, त्यासाठी त्यांच्या कार्यशाळांचे आयोजन, कृषीसहलीस चालना देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे कृषीमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शेतीचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी कृषी विभागाला निधीपेक्षा उत्तम नियोजनाची आवश्यकता आहे. उपलब्ध निधी हा गरजेनुसार वापरण्यासाठी प्राधान्यक्रम ठरविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी प्राप्त झालेले अर्ज आणि मंजूर झालेल्या अर्जांबाबत त्यांनी जिल्हानिहाय आढावा घेतला. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सिंरोंचा एटापल्ली यासारख्या दुर्गम भागात शेतकऱ्यांना सहजरित्या खतपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या आदेश कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी दिले.

गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील दुर्गम भागात नक्षलवाद्यांच्या कोणताही त्रास नसल्यामुळे त्या भागात अधिकाऱ्यांना उत्तम काम करण्याची मोठी संधी असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले की, या भागात कृषी विभागाच्या विविध योजना तत्परतेने राबविल्या जात आहेत. दुर्गम भागासह यावर्षी खत न मिळाल्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरणार नाही, याची योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले. गोपीनाथ मुंडे कृषी अपघात विमा, पंतप्रधान सिंचन योजना आणि खते शेतकऱ्यांना सहज उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचण्याचे आदेश दिले.

कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांनी कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना येत असलेल्या अडचणी समजून घेतल्या. कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना शेतकऱ्यांना समजावून सांगून त्या त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तसेच कृषी योजनांच्या योजना त्यांच्या बांधावर जावून सांगा तसेच कृषी उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना प्रधान सचिवांनी दिल्यात. नागपूर विभागातील खरीप हंगामाची पूर्वतयारी तसेच शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज सहजतेने उपलब्ध व्हावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी प्रास्ताविक व सादरीकरण केले. तर आभार प्रदर्शन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. शेंडे यांनी मानले.