Published On : Sat, May 27th, 2017

शेतकऱ्यांनी जोडधंदा, प्रक्रिया उद्योगाकडे वळावे – राज्यपाल बनवारीलाल पुरोहित

Advertisement
  • थडीपवनी येथे कृषी विकास केंद्राचे लोकार्पण
  • शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

नागपूर: कोरडवाहू शेतीच्या उत्पादनावर शेतकऱ्याचा विकास शक्य नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा व शेतीमधील उत्पादीत मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाकडे वळावे, असे आवाहन आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.

नरखेड तालुक्यातील थडीपवनी येथे कृषि विकास प्रतिष्ठानतर्फे बांधण्यात आलेल्या सुसज्ज अशा नितीन गडकरी कृषि व कौशल्य विकास केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार कृपाल तुमाने, अशोक नेते, आमदार सर्वश्री डॉ. अनिल बोंडे, डॉ. सुनील देशमुख, डॉ. आशिष देशमुख, वनराईचे विश्रस्त तथा कृषी विकास प्रतिष्ठानचे प्रमुख गिरीष गांधी, विभागीय आयुक्त अनूप कुमार, अमरावतीचे महापौर संजय नरोने, माजी खासदार प्रदीप गांधी आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना शेतीमधील कौशल्य देण्यासाठी गिरीष गांधी यांनी सुरु केलेले शेतकऱ्यांसाठीचे केंद्र निश्चितच उपयुक्त असल्याचे सांगतांना राज्यपाल श्री. पुरोहित म्हणाले कि, आज शेतीमधून उत्पन्न कमी येत असताना शेतकऱ्यांना आता जोडधंदा आणि प्रक्रिया उद्योगाकडे वळणे गरजचे आहे. शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी या केंद्रातून प्रशिक्षण देण्यात यावे. प्रक्रियेनंतर बाजारपेठेत माल विकला जावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

थडीपवनी भागात संत्र्याचे मोठे उत्पादन होते, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी या केंद्रात विशेष प्रयत्न व्हावे. तसेच स्वत:चे उत्पादन तयार करावे. शेतपिकांवर प्रक्रिया करण्याच्या सुविधा आहेत तसेच शासनांच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. शेती फायद्याची व्हावी, यासाठी शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर अधिक उत्पन्न घेणाऱ्या पीक पद्धतीचा उपयोग करावा. ठिंबक सिंचनातून कमी पाण्यावर अधिक उत्पन्न घेणे शक्य आहे. या पद्धतीचा शेतकऱ्यांनी उपयोग करावा, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.


पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्य शासन शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. सौर उर्जेवरील पंप देऊन शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासोबतच कमी वीज खपतीचे पंप शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासाला प्राधान्य देण्यात आले असून कायम शेतकऱ्यांचाच विचार करणारे हे सरकार आहे. शेतकऱ्यांनी येत्या काळात बाजारपेठेत जे विकले जाते, त्याचेच उत्पादन करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी चांगल्या दर्जाचे कुंपन देण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

प्रारंभी शेतकरी कौशल्य विकास केंद्राचे प्रमुख गिरीष गांधी यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात शेतकऱ्यांसाठी केंद्र उभारण्यामागील संकल्पना समजावून सांगितली. कार्यक्रमाचे संचलन बाळ कुळकर्णी यांनी केले. आभार बंडोपंत उमरकर यांनी मानले. यावेळी प्रा. अरूण वानखेडे, आर्किटेक्ट अनिख खोमोशी यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रम विविध संस्थांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, शेतकरी तसेच अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

पारडसिंगा येथील बहुउपयोगी सभागृहाचे लोकार्पण
आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते पारडसिंगा येथील श्री सती अनुसया माता संस्थानच्या बहुउपयोगी सभागृहाचे लोकार्पण केले. या सभागृहामुळे पारडसिंगा येथे येणाऱ्या भाविकांची तसेच पर्यटकांची सुविधा झाली आहे.

राज्यपाल श्री. पुरोहित यांनी सर्वांग सुंदर इमारत संस्थानने बांधल्याबद्दल विश्वस्तांचे अभिनंदन केले. या सभागृह निर्मितीसाठी योगदान देण्यांचे त्यांनी कौतुक केले. चांगल्या कार्यासाठी हे सभागृह उपयोगी पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चांगल्या कार्यासह गरीबांना मोफत सभागृह देण्याबाबतचा अधिकार विश्वस्तांना द्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये संस्थान आणि गावाने सक्रीयपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. यावेळी श्री. पुरोहित यांच्या हस्ते नगर परिषद काटोलच्या डिजीटल स्कूलचे उद्घाटन करण्यात आले.