Published On : Fri, Oct 18th, 2019

शहरात ओडीएफ प्लस प्लस मानांकनासाठी दर्जेदार सुविधा द्या – आयुक्त

Advertisement

स्वच्छ सर्वेक्षणाच्या कामासंदर्भात कर्मचाऱ्यांची कार्यशाळा शहराला ओडीएफ ++ मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करणार

नागपूर: शहराला ओडीएफ प्लस मानाकंन प्राप्त झाले आहे. आता शहराला ओडीएफ प्लस प्लस मानांकन मिळविण्यासाठी मनपा प्रयत्न करत आहे. ओडीएफ प्लस प्लस मानाकंनासाठी शहरातील सर्व सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांना दर्जेदार सुविधा द्यावा, असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. शहरातील स्वच्छतेबाबत कुठलिही हलगर्जी चालवून घेणार नाही. शहरातील स्वच्छता ही प्राधान्याने करावी. शहरातील सार्वजनिक व सामूदायिक शौचालयेही सुस्थितीत व स्वच्छ ठेवावी, त्याठिकाणी कुठलिही अस्वच्छता नको. तसेच शहरातील स्वच्छतेच्या कामांबद्दल सकारात्मकता बाळगा, असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची कार्यशाळा शुक्रवारी (ता.१८) महाल येथील राजे रघूजी भोसले नेताजी नगर भवन येथे आयोजित कऱण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, आरोग्यधिकारी डॉ. सुनील कांबळे, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, ग्रीन व्हिजीलचे कौस्तभ चॅटर्जी, सेन्टर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या लीना बुधे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रारंभी आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2020 बाबत शासनाने दिलेल्या मार्गदर्शिकेबाबत चर्चा केली. या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण हे चार प्रमुख मुद्द्यांवर अवलंबून असल्याची माहिती त्यांनी दिली. नागपूर शहराला ओडीएफ प्लस मानांकन मिळाले आहे. आता शहराला ओडीएल प्लस प्लस हे मानांकन मिळावे यासाठी मनपा प्रयत्न करणार आहे. शहरातील सर्व सार्वजनिक व सामूदायिक शौचालये हे स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काय उपाययोजना कराव्या याचे मार्गदर्शन यावेळी आयुक्तांनी केले.

शहरातील सर्व सार्वजनिक शौचालये ही सुलभ या संस्थेमार्फत चालविण्यात येतात. ज्या नागरिकांना वैयक्तिक शौचालये उपलब्ध नाहीत त्यांच्यासाठी सामूदायिक शौचालये निर्माण केली आहे. यानंतर प्रत्येक शौचालयामागे एक नोडल अधिकारी, जामादार, स्वच्छता कर्मचारी नेमून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व कर्मचाऱ्यांवर त्यांच्या झोनल अधिकारी व सहायक आयुक्तांनी लक्ष ठेवावे, असे आदेश आय़ुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. सर्व सार्वजनिक शौचालये व सामूदायिक शौचालये ही प्रत्येक तासामागे स्वच्छ दिसेल याची काळजी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी घ्यायची आहे. ओडीएफ प्लस प्लस मानांकन मिळविण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शिकेबाबत त्यांनी माहिती दिली. त्यात 24 तास निरिक्षक, सफाई कामगार राहील याची दक्षता घ्यावी. दर्जेदार स्वच्छता व पुरेसे मनुष्यबळ शौचालयात असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शौचालयातील नळाला पुरेसे पाणी असणे अत्यावश्यक आहे. नसल्यास जलप्रदाय विभागाकडून पाण्याची व्यवस्था करून घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. स्वच्छतेच्या बाबतीत शौचालय स्वच्छ केल्यानंतर फरशी ओली राहता कामा नये, ती पुसून कोरडी करून स्वच्छ ठेवावी. शौचालयातील आरसे हे सुस्थितीत असलेले दिसले पाहिजेत. प्रत्येक शौचालयात कचरा पेटी असणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. पाणी गळतीची जागा शोधून त्याठिकाणी डागडूजी करण्यात यावी, संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी या गोष्टींकडे लक्ष देण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. शौचालयात उपस्थिती पत्रक लावण्यात यावे. पुरूष व महिला असे दिशाफलकही लावण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. शौचालयातील असलेले अतिक्रमण तातडीने काढण्याचे निर्देशही यावेळी आयुक्त श्री.बांगर यांनी दिले. शौचालयाची दिशा दाखविणारे फलक सभोवतालच्या शंभर मीटर परिसरात लावण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले. सर्वात महत्वाचे म्हणजे शौचालयाचे सांडपाणी हे उघडे न राहता त्यासाठी सेप्टी टॅंक किंवा सिवरेज लाईनमध्ये जाईल याची व्यवस्था करावी, असेही आयुक्तांनी सांगितले. शौचालयात अभिप्राय नोंदविता येईल याची व्यवस्था करण्यात यावी. सर्व शौचालये ही गुगल मॅप वर एसबीएम टॉयलेट या नावाने दिसेल यासाठी प्रयत्न करावे, असेही आयुक्तांनी सांगितले.

सार्वजनिक शौचालये व सामूदायिक शौचालयांपैकी 25 शौचालये ही बेस्ट स्वरूपाची म्हणून नेमण्यात आलेली आहे. त्य़ामधील सोयीसुविधा या अत्याधुनिक राहणार आहे. त्यामध्ये बाथरूम म्हणजे आंघोळीसाठी बाथरूम सोय असणार आहे. प्रत्येक शौचालयामध्ये रूम फ्रेशनर, हॅंड ड्रायर, महिलांसाठी सॅनीटरी नॅपकीन, डिटरमीनेशन्स मशीन्स असणार असून त्यावर बायो मेडिकल वेस्ट असे लिहणे अंतर्भूत आहे. शौचालया पसिरात झाडे लावावे, असेही आयुक्त यांनी सांगितले. शौचालयाच्या परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत जलप्रदाय विभागाशी संपर्क साधावा, असेही सांगितले.

या सर्व गोष्टींचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. यासर्व गोष्टी आपण केल्या तर शहराला ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त होईल. यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात आपला क्रमांक सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यवाही दरम्यान काही असामाजिक तत्वे त्रास देत असलतील तर उपद्रव शोध पथकाना पाचारण करून त्रास देणाऱ्यांची नावे पोलिसांना सांगून कारवाई करावी, असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.