Published On : Mon, Apr 16th, 2018

पशुपालकांना उच्च दर्जाचे पशुधन उपलब्ध करुन देणार – महादेव जानकर

Advertisement

मुंबई: देशी गायी, म्हशींच्या वंशावळ सुधारण्याच्या कामाला राज्य शासनाने गती दिली असून आगामी काळात पशुपालकांना उच्च दर्जाच्या आणि दर्जेदार तसेच अधिक दूध उत्पादन क्षमतेच्या गायी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.

‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ अंतर्गत मंजूर निधीतून ताथवडे (ता. मुळशी, जि. पुणे) येथील पशु प्रक्षेत्रावर (कॅटल फार्म) उभारण्यात येणाऱ्या पशुंच्या गोठ्याचे भूमिपूजन श्री. जानकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार शरद ढमाले, पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप, अतिरिक्त आयुक्त डी. एम. चव्हाण, ताथवडे फार्मचे व्यवस्थापक श्री. विधाते आदी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत ताथवडे येथील कॅटल फार्ममध्ये 600 पशुंची जोपासना करता येईल असे गोठे बांधण्यात येणार आहे. यासाठी 2 कोटी 46 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या ठिकाणी सध्या 95 म्हशी संगोपनासाठी घेण्यात आल्या आहेत. पशुंच्या प्रजनन कालावधीनंतर अधिक पशु घेण्यात येणार आहेत. लष्कराच्या गायीदेखील या गोठ्यासाठी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. हा गोठा अत्यंत आधुनिक पद्धतीने बांधण्यात येणार असून संपूर्णत: तांत्रिक पद्धतीने जोपासना केली जाणार आहे.

गोठ्याच्या उभारणीसाठी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून (सीईओपी) तांत्रिक सल्ला, आराखडा तयार करुन घेण्यात आला आहे. पशुंना जागेवर जाऊन पशुखाद्य देण्यासाठी ट्रॅक्टरला जोडण्यात येणारे आधुनिक यंत्र वापरले जाणार असून हिरवा चारा, वाळला चारा तसेच पशुखाद्य (खुराक) योग्य प्रमाणात मिसळून देण्याची या यंत्रामध्ये व्यवस्था असणार आहे. जनावरांची विष्ठा (शेण) ट्रॅक्टरचलित यंत्राच्या सहाय्याने उचलण्यात येणार आहे. तसेच दूध काढण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था करण्यात येणार असून यंत्रांच्या सहाय्याने दूध काढण्यात येणार आहे.

गायी- म्हशी धुण्यासाठी स्प्रिंकलर व्यवस्था करण्यात येणार आहे. पाणी देण्यासाठीही स्वयंचलित यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. तसेच जनावरांना बांधून न ठेवता मुक्तसंचार पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. येथून उत्पादित होणारे दूध दर्जेदार तसेच आरोग्यदायी असणार असून थेट ग्राहकांना विक्री केली जाणार आहे. त्यातून प्रक्षेत्राची देखभाल व देखरेख खर्च भागविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ताथवडे प्रक्षेत्रावर पशुंची जोपासना करण्याबरोबरच अत्याधुनिक पद्धतीने वंशावळ सुधारणेसाठी संशोधनही करण्यात येणार आहे. गीर, साहिवाल या अधिक दूध देणाऱ्या गायींसोबतच खिलार, डांगी, देवणी या देशी गायी वंशावळ सुधारणेसाठी विकत घेण्यात येणार आहेत. या गायी, म्हशींच्या वंशावळ सुधारणेसाठी सरोगसी तसेच आयव्हीएफ या आधुनिक तंत्रज्ञानाचाही अवलंब करण्यात येणार आहे, अशी माहिती फार्मचे व्यवस्थापक श्री. विधाते यांनी दिली आहे.