Published On : Mon, Apr 16th, 2018

मत्स्यसंवर्धनासाठी चांदा ते बांदा योजनेतून निधी – महादेव जानकर

मुंबई: राज्यात मत्स्यव्यवसायात अमर्याद संधी असून युवकांनी या क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी. चांदा ते बांदा योजनेंतर्गत कोळंबी, जिताडा तसेच खेकडा संवर्धन (क्रॅब कल्चर) आदी बाबींना प्रोत्साहन देण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिली.

चांदा ते बांदा योजनेंतर्गत चंद्रपूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यसायाला चालना देण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी श्री. जानकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हे निर्देश देण्यात आले.

शासन या उद्योगाला चालना देण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे, असे सांगून या बैठकीत व्हेनामी कोळंबीच्या बीज उत्पादन केंद्र (हॅचरी), खेकडा हॅचरीज, जिताडा मासा हॅचरीज व संवर्धन, खारे व गोड्या पाण्यातील पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन, मासेमारी जेट्टींचे आधुनिकीकरण आदी बाबींची चर्चा करण्यात आली. राज्यात मोठ्या प्रमाणात जलक्षेत्र उपलब्ध असून सागरी किनाऱ्यावरील मत्स्यपालनासाठीही उपयुक्त जागा उपलब्ध आहेत. कोळंबी, खेकडा, जिताडा माशांचे पालन तसेच पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धनासाठी उपलब्ध जागांची तांत्रिकदृष्ट्या पाहणी व व्यवहार्यता तपासून या बाबींसाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे निर्देश श्री. जानकर यांनी यावेळी दिले.

श्री. केसरकर यावेळी म्हणाले की, चांदा ते बांदा ही योजना कोकण तसेच विदर्भातील जिल्ह्यांच्या विकासासाठी महत्वाकांक्षी योजना असून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी यातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सर्वसामान्यांना शाश्वत रोजगार उपलब्ध होण्यासाठी मत्स्यसंवर्धनाच्या योजना उपयुक्त असून यासाठी भरीव निधी दिला जाईल, असेही श्री. केसरकर म्हणाले.

यावेळी विभागाचे सचिव किरण कुरुंदकर, मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण विधळे, मँग्रोव्ह सेलचे प्रमुख तथा अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन, सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे (MPEDA) उपसंचालक श्री. नाईक, मत्स्यव्यवसाय उपसचिव विजय चौधरी, सहआयुक्त राजेंद्र जाधव, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मत्स्य महाविद्यालयाचे प्रकाश शिनगारे आदी उपस्थित होते.