| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jun 4th, 2021

  विद्यापीठच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये लहान मुलांसाठी २०० खाटांचे कोव्हिड रुग्णालय प्रस्तावित

  महापौर व प्र-कुलगुरु यांनी केला दौरा


  नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लहान मुलांना असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लहान मुलांसाठी कोव्हिड रुग्णालयाचे वेळीच पूर्व नियोजन करण्याचा नागपूर महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. या संबंधात महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज नवीन प्रशासकीय इमारत विद्यापीठ परिसराचा दौरा केला. यावेळी प्र.कुलगुरु डॉ.संजय दुधे उपस्थित होते.

  नागपूर मनपा तर्फे लहान मुलांसाठी २०० खाटांचे कोव्हिड रुग्णालय येथे प्रस्तावित आहे. सध्या नागपूर विद्यापीठाचे कार्यालय येथील तळमजल्यावर सुरु आहे. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या माळयावर ऑक्सीजन सोयीयुक्त १५० खाटा व ५० आय.सी.यू. खाटांचे लहान मुलांसाठीचे रुग्णालय प्रस्तावित आहे.

  या इमारतीमध्ये मोठे सभाकक्ष व खोल्या आहेत. सोबतच येथे पालकांना थांबण्यासाठी सुध्दा व्यवस्था केली जाईल. तसेच मनपातर्फे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी टी.व्ही.ची व्यवस्था असेल. ज्यामध्ये त्यांना कार्टून फिल्म दाखविल्या जाईल. भिंतीवर कार्टून चित्र असतील. या रुग्णालयात लागणाऱ्या सर्व उपकरणाची व्यवस्था विधानसभेचे विरोधी पक्ष नेते श्री. देवेन्द्र फडणवीस करणार आहेत.

  मनपातर्फे पाण्याची व्यवस्था, ऑक्सीजन, खाटांची व्यवस्था करण्यात येईल. तसेच बालकांसाठी तज्ञ डॉक्टरांची सुध्दा व्यवस्था केली जाईल. महापौरांनी या कार्यात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची सुध्दा मदत घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी मनपा उपायुक्त श्री. मिलींद मेश्राम, विद्यापीठचे कुल सचिव डॉ. अनिल हिरेखन, संजय दहिकर व महेश कुकडेजा आदी उपस्थित होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145