Published On : Tue, Mar 31st, 2020

निर्जंतुकीकरणासाठी योग्य प्रकारेच फवारणी

Advertisement

मनपाचे स्पष्टीकरण : अफवा पसरविणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार

नागपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागपुरात अग्निशमन गाड्यांद्वारे आणि स्वच्छतादूतांद्वारे आवश्यक त्या भागात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्याचा निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला. मात्र, काही लोकांनी केवळ पाणी फवारले जात असल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाशी लढण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रामाणिक प्रयत्न करीत असून अफवा पसरविणाऱ्यांविरोधात पोलिस तक्रार करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निर्णय घेतल्यानंतर मनपाअंतर्गत असलेल्या शहरातील दहाही झोनमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. यामध्ये सोडियम हायपोक्लोराईडचा वापर करण्यात येत आहे. मात्र, जरीपटका भागातील काही लोकांनी या फवारणीचा व्हिडिओ तयार करून निर्जंतुकीकरणाच्या नावावर निव्वळ पाण्याची फवारणी होत असल्याचा आरोप केला आहे.

तसा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये टाकून समाजामध्ये भीती पसरविण्याचे कार्य काही लोकांच्या माध्यमातून होत आहे. मात्र, कोरानापासून नागपुरातील लोकांचा बचाव व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासन आणि नागपूर महानगरपालिका प्रामाणिक प्रयत्न करीत असून हॅण्ड स्प्रे द्वारे सुद्धा सोडियम हायपोक्लोराईडचीच फवारणी होत आहे. मात्र जे लोक त्यातून केवळ पाणी फवारल्या जात आहे अशी अफवा पसरवित आहे, त्यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार देण्यात आली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे डॉ. प्रदीप दासरवार यांनी सांगितले.