Published On : Fri, Sep 17th, 2021

जरीपटका परिसरातील पाणीपुरवठा संबंधी प्रलंबित कार्य तातडीने पूर्ण करा

मंगळवारी झोन सभापती प्रमिला मथरानी आणि वीरेंद्र कुकरेजा यांचे ओसीडब्ल्यूला सक्त निर्देश

नागपुर: मंगळवारी झोन अंतर्गत प्रभाग १ मधील जरीपटका परिसरामध्ये २४ बाय ७ योजनेंतर्गत पाणीपुरवठा कार्य अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या परिसरात अनेक भागात पाणीपुरवठा संबंधी कार्य प्रलंबित व अर्धवट स्थितीत आहेत. हे सर्व तातडीने पूर्ण करा, असे निर्देश मंगळवारी झोन सभापती प्रमिला मथरानी व माजी आरोग्य समिती सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिका-यांना संयुक्तरित्या दिले.

जरीपटका परिसरातील २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेच्या कार्यासंबंधी वीरेंद्र कुकरेजा व प्रमिला मथरानी यांनी जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई यांच्या कक्षामध्ये मनपा जलप्रदाय विभाग व ओसीडब्ल्यूच्या अधिका-यांसोबत आढावा बैठक घेतली. बैठकीत जलप्रदाय विभागाच्या प्रकल्प अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्ल्यूचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय रॉय, निदेशक के.एम.पी. सिंह, राजेश कालरा, अनिकेत गाडेकर, वार्डाचे नागरिक मनीष दासवानी, जगदीश वंजानी, जय साजवानी, हरीश मूलचंदानी, गुलशन दात्रे, कमल मोटवानी, सतीश टहलरामानी, खेलेंद्र बिठले आदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये ज्येष्ठ नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा व मंगळवारी झोन सभापती प्रमिला मथरानी यांनी ओसीडब्ल्यूच्या कार्यप्रणालीवर नाराजी वर्तविली. जरीपटका परिसरामधील अर्धवट व प्रलंबित कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या भागातील कार्य तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा मिळवून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मनपा जलप्रदाय विभाग व ओसीडब्ल्यूच्या अधिका-यांनी संबंधित कार्य तातडीने पूर्ण करण्याच्या दिशेने त्वरीत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगत मुख्य प्रवाह वाढवून लवकरात लवकर नागरिकांना दिलासा मिळवून देणार असल्याबाबत आश्वस्त केले.