Published On : Thu, Jan 18th, 2018

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहन आवश्यक – महापौर नंदा जिचकार


नागपूर: भारतीय घटनेतील 73व 74व्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांची भागीदारी वाढली आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून संधी निर्माण होत असतानाच समाजाने त्यांना प्रोत्साहन दिले तर महिला अधिक समक्षपणे काम करु शकतात, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात 73 व 74व्या घटना दुरुस्तीची रजत जयंती, ‘प्रगती आणि वाटचाल’ या नागपूर विभागीय परिषदेचे उद्घाटन महापौर नंदाताई जिचकार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थ विनायक काणे होते. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रा.अनिल सोले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर, विभागीय आयुक्त अनूप कुमार, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, महानगर पालिका आयुक्त अश्विन मुदगल आदी उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांना घटना दुरुस्तीच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकारामुळे सर्व निवडणुका निर्भय आणि मुक्त वातावरणात नियमित होत असल्याचे सांगताना महापौर जिचकार म्हणाल्या की, घटना दुरुस्तीमुळे महिलांना राजकारणात स्थान मिळाले आहे. परंतु निवडणूक प्रक्रियेत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीतही महिला सक्षमपणे मिळालेल्या संधीचा समाजाला किती लाभ देता येईल यासाठी सक्रिय आहेत. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी स्वायत्त संस्थांच्याच माध्यमातून होत असल्यामुळे महिलांनीही सामान्य जनतेसाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन काम करावे.


अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी घटनेच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकारामुळेच सामान्य जनतेपर्यत विकासाची प्रक्रिया पोहोचत आहे. घटनेच्या 73 व 74व्या घटना दुरुस्तीमुळेच तळागाळापर्यत लोकशाही पोहोचली आहे. स्वातंत्र्यानंतर गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडत घटनेमुळे मिळालेल्या अधिकाराचा वापर करण्यासंदर्भात जनतेमध्ये जागरुकता निर्माण झाली असल्यानेच दर पाच वर्षांनी पारदर्शक व निष्पक्षपणे निवडणुका होत आहेत. याचे मूल्यमापन करायचे आहे. ग्रामविकासाची संकल्पनाच तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून सांगितली असून त्यानुसारच पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली आहे. या व्यवस्थेमुळे शेवटच्या माणसापर्यत लोकशाही पोहोचली किंवा नाही याचे मूल्यमापन केल्यास आपला देश सर्वाधिक लोकशाहीवादी देश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विभागीय आयुक्त अनूप कुमार
घटना दुरुस्तीच्या रजत जयंती निमित्त प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी घटनेच्या माध्यमातून विकासाचा मूलभूत अधिकार प्रदान झाल्यानंतर विविध संस्थांमध्ये लोकशाही प्रक्रिया पाळल्या जात नसल्यामुळे 73 व 74व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकट करण्यात आल्या

आहेत. महात्मा गांधी यांनी ग्राम स्वराज्याची संकल्पना मांडली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गावाची संरचना जाती व्यवस्थेवर आधारित असल्यामुळे सामाजिक न्यायाच्या माध्यमातून पासून वंचितासाठी लक्ष केंद्रीत केले. महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्या संकल्पनांचा समन्वय या घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाटचालीमध्ये राज्याची वाटचाल देशात उत्कृष्टपणे सुरु आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पुरुषांचे असलेले वर्चस्व कमी होऊन महिलांनाही समान अधिकार मिळाला आहे. त्यामुळे मिळालेली प्रतिष्ठा तसेच सक्षमीकरणासाठी मोठी चालना मिळाली आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिला आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम होत असतानाच ग्रामसभा तसेच शहरी भागातील वार्ड सभा अधिक चांगल्या पद्धतीने सक्षम होण्याची आवश्यकता व्यक्त केली. बदलत्या परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यपद्धती व रचना कशी असावी यासंदर्भात विद्यापीठांनी अभ्यास करुन आपल्या सूचना सादर कराव्यात अशी अपेक्षाही यावेळी अनूप कुमार यांनी व्यक्त केली.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी घटना दुरूस्तीच्या रजत जयंती निमित्त राज्यातील सर्व विभागांमध्ये प्रगती आणि वाटचाल या संदर्भात परिषदा आयोजित करण्यात येत असून यामाध्यमातून आलेल्या सूचनांचा राज्य स्तरावर एकत्र अहवाल तयार करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव असल्यामुळे त्यांना येणाऱ्या अडचणी संदर्भात प्रशिक्षणासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असल्याचे सांगितले.

राज्य निवडणूक आयोगामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाच्या धर्तीवर घेण्यात येत आहेत. त्यासाठी राज्यातील 28 हजार स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकांच्या माध्यमातून अडीच लाख प्रतिनिधी निवडून येतात. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करतांना 12 लक्ष 50 हजार प्रतिनिधी साधारणत: निवडणूकीसाठी उभे राहतात. लोकसभेच्या धर्तीवरच ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा घेण्याचा प्रयत्न आयोगाचा आहे. निवडणुका पारदर्शकपणे होण्यासाठी देशात प्रथमच उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याचा यशस्वी प्रयोग राबविण्यात आला आहे. मतदारांनाही उमेदवाराबद्दलची संपूर्ण माहिती मिळण्यासाठी सुविधा निर्माण करण्यात आली असल्याचे शेखर चन्ने यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी उपस्थित अतिथींचे पुस्तक व गुलाबपुष्प भेट देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे यांनी केली.


ई.झेड.खोब्रागडे
गावाचा संपूर्ण विकास करायचा असेल तर लोकप्रतिनिधींनी समाजाच्या तळागाळापर्यंत जाऊन काम करावे. यामुळे जनतेच्या मनात आदर निर्माण होईल, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी ई. झेड.खोब्रागडे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ‘स्थानिक स्वराज्य संस्थाची वास्तविकता’ या विषयावर आयोजित चर्चासत्र कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते मोहन हिरालाल हिराभाई, प्रा. शेषकुमार येर्लेकर, सरपंच चंदू पाटील मारकवार, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताला ई.झेड. खोब्रागडे म्हणाले, या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण दिल्याने त्यांना जनतेचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे याचा महिला वर्गांना समाज तसेच गावाच्या विकासासाठी उपयोग करुन घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोहन हिरालाल हिराभाई मार्गदर्शन करताना म्हणाले, 73 व 74 व्या घटनादुरुस्तीमुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामसभा यांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले. परंतु गावाचा विकास करीत असताना अनेकदा आर्थिक अडचणी येतात. यामुळे ग्रामविकास करताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते.

73 व्या घटना दुरुस्तीला 25 वर्षे पूर्ण झाली असली तरी आजचा ग्रामीण भाग विकासाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहीला आहे. महात्मा गांधीच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी गावाचा विकास होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रा. शेषकुमार येर्लेकर यांनी यावेळी केले.

याप्रसंगी चंद्रपूरचे जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे आणि सरपंच चंदू पाटील यांनी आपले विचार मांडले.