खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नागपूरमधील खेळाडूंना प्रोत्साहन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर: खासदार क्रीडा महोत्सव नागपूरच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असून या स्पर्धेच्या माध्यमातून नागपुरमधील खेळाडू तसेच क्रीडाप्रेमींना प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत एनआयटी स्केटिंग पार्क येथे स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, आमदार डॉ. परिणय फुके, पक्षनेते संदिप जोशी, शैलेंद्र पराशर आदी उपस्थित होते. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, नागपूर हे खेळाचे माहेरघर असून सर्व खेळाडू व क्रीडाप्रेमींसाठी खासदार क्रीडा महोत्सव ही सुवर्णसंधी आहे. ही क्रीडा स्पर्धा नागपूरच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असून याअंतर्गत शहराच्या विविध भागात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. खेळाडूंना जास्तीत-जास्त स्पर्धांमध्ये सहभागी होता आले पाहिजे, ज्यायोगे हे खेळाडू स्पर्धेत टिकून राहून देशाचे नाव उज्ज्वल करतील, असेही त्यांनी सांगितले.