| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Feb 20th, 2018

  कॉलेजमध्ये लेक्चर देताना वारंवार ‘SEX’वर घसरणाऱ्या प्रोफेसरला कोर्टाने धरले दोषी

  Gavel, Court

  Representational Pic


  मुंबई: वर्गात लेक्चर देताना वारंवार ‘सेक्स’ शब्दाचा उल्लेख करणा-या नर्सिंग कॉलेजच्या प्राध्यापकाला कोर्टाने दोषी ठरवले आहे. या प्राध्यापकाने विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याचे कोर्टाने म्हटले आहे. प्राध्यापक रमेश बांद्रे हा मेडिकल सर्जिकल पार्ट 1 हा विषय सोडून हनीमून, लग्नाच्या पहिल्या रात्री काय अपेक्षित आहे अशा विषयांवर चर्चा करायचा. प्राध्यापकाच्या या वर्तनाविरोधात नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने तक्रार केली.

  रमेश बांद्रेने त्याचे लैंगिक अनुभव लिहिलेली पर्सनल डायरी वाचण्यासाठी दिली होती असा आरोप एका विद्यार्थीनीने केला होता. सेक्सच्या विषयात पाप किंवा कुठलीही अनैतिकता नाही. फक्त तो विषय योग्य पद्धतीने शिकवला पाहिजे असे कोर्टाने बांद्रेला दोषी ठरवताना म्हटले आहे. या प्रकरणात विषय शिकवताना प्राध्यापकाचा विद्यार्थींनीचा विनयभंग करण्याचा आणि त्यांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा हेतू दिसून येतो असे कोर्टाने म्हटले आहे.

  बांद्रेचे पीएचडी पर्यंतच शिक्षण लक्षात घेऊन कोर्टाने त्याची प्रोबेशनवर सुटका करण्याची परवानगी दिली आहे. बांद्रेवर ज्या कलमाखाली गुन्हा दाखल आहे त्यासाठी आधी एकवर्षाची शिक्षा होती. आता कायद्यातील दुरुस्तीनंतर दोनवर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 16 जून 2012 रोजी रमेश बांद्रेविरोधात गुन्हा दाखल झाला. एका विद्यार्थीनीने त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला.

  सेक्सची शिकवणी विषयाशी संबंधित नाही असे अनेकदा त्याला विद्यार्थींनीने सांगितले तरीही तो सतत सेक्सवर घसरायचा. त्यामुळे त्याच्या विरोधात विद्यार्थीनीने तक्रार दाखल केली. प्रोबेशन ऑफेंडर्स अॅक्ट अंतर्गत दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा होऊ शकते. आरोपीची याआधी कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे समज देऊनही आरोपीची सुटका होऊ शकते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145