Published On : Thu, Oct 12th, 2017

व्यावसायिक रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण नोंदणीचे शुल्क वाढणार

Advertisement

नागपूर : शहरात सध्या अस्तित्वात असलेल्या आणि नव्याने नोंदणीसाठी मनपाकडे येणाऱ्या व्यावसायिक रुग्णालयांसाठी आता नवे बाह्य रुग्ण धोरण लागू होणार आहे. सदर धोरणाचा आराखडा तयार झाला असून मनपाच्या आरोग्य समितीने काही सूचनांसह मंजुरी दिली आहे. नवे सुधारीत धोरण लवकरच सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे. या धोरणानुसार आता शहरातील रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण व्यावसायिक नोंदणीचे शुल्क वाढणार आहे.

सध्या व्यावसायिक रुग्णालयांना मनपामध्ये बाह्य रुग्ण नोंदणी करायची असेल तर वर्षाकाठी केवळ ५०० रुपये नोंदणी शुल्क आकारले जाते. नवे धोरण मंजूर झाल्यानंतर सदर रुग्णालयांना वर्षाकाठी चार हजार रुपये नोंदणी शुल्क अदा करावे लागतील. धोरणामध्ये अन्य बाबीसुद्धा समाविष्ट असून नवीन रुग्णालयाला नगररचना विभाग आणि अग्निशमन विभागाच्या ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच आरोग्य विभागातर्फे नोंदणी करण्यात येईल.

मनपा आरोग्य समितीची बैठक गुरुवारी (ता. १२) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीला महापौर नंदा जिचकार, प्रतोद दिव्या धुरडे, वैद्यकीय व आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले, समिती सदस्य नगरसेवक लखन येरावार, विजय चुटेले, नगरसेविका विशाखा बांते, भावना लोणारे, आशा उईके, वंदना चांदेकर, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (मे) डॉ. अनिल चिव्हाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, पशुचिकित्सा अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, मलेरिया व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, डॉ. सुनील घुरडे, मुकुंद खोजे, कारखाना विभागाचे राजेश गुरुनुले उपस्थित होते. सदर बैठकीत डॉ. अनिल चिव्हाणे यांनी मनपा आरोग्य विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या धोरणाचे समितीपुढे वाचन करण्यात आले. यावर चर्चा झाल्यानंतर काही सूचनांसह त्याला मंजुरी देण्यात आली. लवकरच सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती सभापती मनोज चापले यांनी दिली.

सदर बैठकीत ताजबाग येथे होणाऱ्या उर्समध्ये आरोग्य विभागातर्फे करण्यात येणाऱ्या व्यवस्थेबाबत आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी माहिती दिली. तर आकस्मिक आरोग्य व्यवस्था, रुग्णवाहिका, उपचार यासंदर्भात आरोग्य अधिकारी (मे) डॉ. अनिल चिव्हाणे यांनी माहिती दिली. १३ ते २१ ऑक्टोबर दरम्यान मनपातर्फे आरोग्य आणि स्वच्छतेविषयी संपूर्ण व्यवस्था करण्यात येणार असून १८ ते २० ऑक्टोबर या दिवसांत अतिरिक्त डॉक्टरांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे डॉ. चिव्हाणे यांनी सांगितले. उर्स काळात खासगी रुग्णालय अथवा डॉक्टरांना सेवा द्यायची असेल तर त्यांनी मनपाच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

संसर्गजन्य डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू व कीटकजन्य रोगावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरातील साफसफाई, नाला सफाई व कचऱ्याची उचल करण्यासंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. शहरातील कचरा उचलणाऱ्या कनक रिसोर्सेसच्या कचरा गाड्या या उपयुक्त नसल्याची माहिती सभापती मनोज चापले यांनी सभागृहात प्रशासनाला दिली. कनकच्या अधिकाऱ्यांना अशा गाड्यासंदर्भात तंबी देण्यात आली.
शहरातील नाल्यांची सफाई केवळ काही काळापुरती न होता नियमित व्हायला हवी, असे निर्देश सभापती मनोज चापले यांनी दिले. याच विषयावरून नाल्यांवर असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेला आला. गांधीबाग झोनअंतर्गत असलेल्या नाल्यावरील अतिक्रमणासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सभापती चापले यांनी दिले.

‘ड्रेनेज’साठी स्वतंत्र विभाग

शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या ‘ड्रेनेज’ सिस्टीम ह्या आरोग्य विभागातर्फे स्वच्छ करण्यात येतात. मात्र, त्यासंदर्भात तांत्रिक माहिती असणारे अधिकारी, कर्मचारी हवेत. त्यामुळे ‘ड्रेनेज’ यासाठी स्वतंत्र विभाग असावा अथवा बांधकाम विभागाला तो जोडण्यात यावा, असा सूर सभेत निघाला. यासंदर्भात लवकरच आयुक्तांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सभापती मनोज चापले यांनी दिली.