Published On : Mon, Sep 27th, 2021

तिसऱ्या लाटेसाठी खाजगी वैद्यकीय यंत्रणेनेही तयारीत राहावे : डॉ. नितीन राऊत

Advertisement

– स्वास्थ्यम् हॉस्पिटलमधील हृदयरोग विशेष कक्षाचे उद्घाटन

नागपूर : नागपूरमध्ये दुसऱ्या लाटेदरम्यान शासकीय यंत्रणेसोबतच खाजगी यंत्रणेनेही अतिशय जबाबदारीने काम केले आहे. याची प्रशासनाने नोंद घेतली असून तिसऱ्या लाटेमध्येही नागपूर शहरातील खाजगी हॉस्पिटल यांची मदत प्रशासनाला लागेल. त्या दृष्टीने तयारीला लागा, असे आवाहन ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.

जागतिक हृदय दिन 29 सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने नागपुरातील स्वास्थ्यम् हॉस्पिटलमध्ये हार्ट विषयक जनजागृती कार्यक्रम गेल्या सात दिवसांपासून सुरू आहे. हॉस्पिटलमध्ये या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांच्या नॉलेज गॅलरीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक डॉ. पंकज हरकुट, डॉ. सोहल पराते, डॉ. रोहित कुमार गुप्ता, डॉ. पुनम हरकुट, डॉ. प्रीती गुप्ता,डॉ. विजय हरकुट यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ‘कार्डीक रिहॅब सेन्टर ‘चे उद्घाटन केले. यावेळी बोलताना शहरातील खाजगी हॉस्पिटलनी तिसऱ्या लाटेसाठी तयार राहण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आरोग्यदायी राहिला आहे. सकाळी एम्सचा तिसरा वर्धापन दिन, दुपारी मेडीशाईन हॉस्पिटल आणि सायंकाळी स्वास्थ्यम् हॉस्पिटलला भेट. या हॉस्पिटलने दुसऱ्या लाटेमध्ये अनेक कोविड रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यासाठी मी या हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचे व वैद्यकीय चमूचे आभार मानतो. त्यांचे कौतुक करतो.

सध्या हृदयरोगाच्या मोठ्या समस्या सर्वदूर आहेत. त्यासाठी स्वास्थ्यम् हॉस्पिटल विशेष अभियान राबवीत असल्याबद्दल मला आनंद होत आहे. या संदर्भातील जनजागृती शाळांमधून करण्याचा अभिनव प्रयोग उल्लेखनीय असून आज या ठिकाणी मला शालेय विद्यार्थ्यांच्या या आजाराबद्दलच्या जागृतीचे दर्शन त्यांच्या छायाचित्रांद्वारे दिसले. ते अतिशय बोलके असून समाजाने या बाबत जागरूकतेने आरोग्य सुधारणा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर हे मध्य भारतातील आरोग्यदृष्ट्या उत्तम सुविधा केंद्र होत असून याचा लाभ मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगाना या राज्याना होत आहे. भौगोलिक दृष्ट्या तेथील नागरिकांना आरोग्य सुविधेसाठी सोयीचे व लाभदायक ठरणार आहे. त्यासाठी आपली यंत्रणा अद्यावत ठेवावी. सोबतच सामाजिक बांधिलकीतून रुग्णांची शुश्रूषा करावी असे आवाहनही त्यांनी केले.