Published On : Tue, Jun 5th, 2018

शिवसेनेसह भाजपच्या नाराज मित्रपक्षांना एकत्र घेण्याचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj-Chavan

मुंबई : भाजप विरोधात साऱ्या पक्ष संघटना एकत्रितपणे लोकसभेसह सर्व सार्वत्रिक निवडणुकांना समोर जात आहेत. त्यात शिवसेनेसह भाजपच्या नाराज मित्रपक्षांना बरोबर घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहील , असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

भाजप सरकारे मोठे घोटाळेबाज आहेत. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा बंगला बेकायदा असल्याचे उघड झाले आहे, पण दोषींना ‘क्लिन चिट’ देणारे सरकार सत्तेत असल्याने उद्या ‘मुख्यमंत्र्यांकडून देशमुखांना क्लिन चिट’ अशी बातमी वाचावयास मिळेल अशी टीका चव्हाणांनी केली.
चव्हाण म्हणाले, की राज्यकर्त्यांकडून आज संसद, न्यायव्यवस्था व निवडणूक यंत्रणेचा गळा घोटला जात असल्यामुळे लोकशाही संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही कार्यप्रणालीमुळे भाजपचे मित्रपक्ष तेलुगू देसम, बिजू जनता दल, अकाली दल, एवढेच नाहीतर त्यांचा जुना सहकारी शिवसेनाही नाराजीतून सध्या वेगळय़ा वाटेवर आहे. या सर्वाना येत्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपविरोधी आघाडीत सामावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी यांनी सरकारच्या नाकर्तेपणा व मनमानी विरोधात घेतलेली भूमिका अतिशय बोलकी आणि महत्त्वाची आहे.