नागपूर : नागपूर सेंट्रल जेलमध्ये बंदींमधील मारामारीची आणखी एक घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी विचाराधीन बंदींमध्ये अचानक वाद झाल्यानंतर एका बंदीवर लाथाबुक्क्यांसह प्लास्टिकच्या बादलीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच कारागृह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जखमी बंदीला उपचारासाठी जेल रुग्णालयात दाखल केले.
ही घटना शांत करण्यासाठी गेलेल्या कारागृह कर्मचाऱ्यांशीही एका बंदीने हुज्जत घातल्याचा आरोप आहे. कर्मचाऱ्याला धमकावून झडप घालण्याचा प्रयत्न केल्याने प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे.
हनुमान मंदिरातून परतताना अडवले
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे ९.४० ते १०.२० वाजेदरम्यान सेंट्रल जेलमधील छोटी गोल विभागातील बैरक क्रमांक ७ आणि ८ दरम्यान ही घटना घडली. विचाराधीन बंदी विजय रहांगडाले हनुमान मंदिरात दर्शन घेऊन बैरककडे परतत असताना दुर्गेश उर्फ लिटिल प्रमोद गुप्ता आणि अश्विन उर्फ अच्छी मुकुंद इंदुरकर यांनी त्याचा रस्ता अडवला. त्यानंतर दोघांनी विजयसोबत मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर त्याच्या डोक्यावर प्लास्टिकच्या बादलीनेही वार करण्यात आल्याची माहिती आहे.
विजयच्या आरडाओरडीनंतर ड्युटीवर असलेले कारागृह कर्मचारी मनोज धनवट यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही बाजूंना वेगळे केले आणि जखमी विजयला जेल रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
मारहाण रोखण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याशीही वाद-
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्याची कारवाई सुरू असतानाच आणखी एका विचाराधीन बंदीने कारागृह कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचे समोर आले आहे. सुरेंद्र उर्फ मोनू मनोज समुद्रे याने कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याचा आरोप आहे. उपनिरीक्षक निमजे यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो शांत होण्याऐवजी त्यांच्याशी वाद घालत झडप घालण्याचा प्रयत्न करू लागला. तसेच सरकारी कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्याला धमकावल्याचाही आरोप आहे.
या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने धंतोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी दुर्गेश उर्फ लिटिल गुप्ता, अश्विन उर्फ अच्छी इंदुरकर आणि सुरेंद्र उर्फ मोनू समुद्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे नागपूर सेंट्रल जेलमधील अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बंदींमधील वाद हिंसक होण्यापूर्वी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी देखरेख आणि प्रभावी यंत्रणा आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच बंदींच्या सुरक्षेसोबतच कारागृह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.




