Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Nov 16th, 2020

  शिक्षक आणि बेरोजगारांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार : महापौर संदीप जोशी

  नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक : दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये घेतल्या पदाधिकारी-मतदारांच्या भेटी

  नागपूर : माझे आई-वडील शिक्षक. त्यामुळे शिक्षकांशी माते जवळचे नाते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. शिक्षकांच्या या प्रश्नांसोबतच सुशिक्षीत बेरोजगरांच्या समस्या सोडविण्यास अग्रक्रम देणार असल्याचा विश्वास नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी-मित्र पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांनी दिला.

  सोमवारी (ता. १६) महापौर संदीप जोशी यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटी घेत संवाद साधला. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. सहा जिल्ह्यांचा हा मतदारसंघ असून प्रचारासाठी दिवस कमी आहेत. त्यामुळे निवडणुकीतील विजयाची सर्व मदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर आहे. प्रत्येक पदाधिकारी हा दिवसरात्र झटत आहे. आता प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याची गरज आहे. प्रत्येक मतदाराला त्यांच्या समस्या सोडविण्याचा विश्वास द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

  दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील आजच्या दौऱ्यात बहुतांश ठिकाणी त्यांची शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न असो की अन्य प्रश्न असो, प्रत्येक शिक्षकाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील, असा विश्वास त्यांनी दिला.

  आजच्या दौऱ्यात महापौर संदीप जोशी यांनी मनीषनगर, न्यू मनीषनगर, सूरज सोसायटी, प्रभू नगर, प्रेरणा सोसायटी, जय अंबे कॉम्प्लेक्स, नरेंद्र नगर, विजयानंद सोसायटी, श्रीनगर, सुयोग नगर, ओंकार नगर, अभय नगर, काशीनगर (रामेश्वरी), जुने स्नेहनगर, स्वावलंबी नगर, इंद्रप्रस्थ ले-आऊट, पांडे ले-आऊट, अत्रे ले-आऊट, त्रिमूर्ती नगर, भेंडे ले-आऊट या परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटी घेतल्या. प्रत्येक भेटीत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संदीप जोशी हे नाव आणि त्यांचे काम सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नांना न्याय देणाऱ्या व्यक्तीच्या हातात पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व द्या, असे आवाहन यावेळी उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी दौऱ्यात दक्षिण-पश्चिम भाजपा अध्यक्ष किशोर वानखेडे, शहर उपाध्यक्ष किसन गावंडे, शहर संपर्क प्रमुख आशीष पाठक, नगरसेविका जयश्री वाडीभस्मे, विशाखा मोहोड, विशाखा बांते, पल्लवी शामकुळे, नगरसेवक संदीप गवई, दिलीप दिवे, प्रकाश भोयर, लहुकुमार बेहते, मंडळ महामंत्री गोपाल बोहरे, महेंद्र भूगावकर, भवानजीभाई पटेल, सतीश देशमुख, प्रभाग अध्यक्ष भूषण केसकर, मनिषा भुरे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

  रांगोळ्या घालून, आरती ओवाळून स्वागत
  महापौर संदीप जोशी प्रचाराच्या निमित्ताने ज्या-ज्या ठिकाणी गेले तेथे रांगोळ्या घातल्या होत्या. दारात येताच त्यांचे आरती ओवाळून आणि औक्षण करून स्वागत करण्यात आले. अनेक महिलांनी त्यांना भाऊबीजेचे औचित्य साधून मोठा भाऊ म्हणून ओवाळले. ज्येष्ठांनी आशीर्वाद दिला तर युवा वर्गाने त्यांनी आपण स्वत:हून मतदान करण्यासाठी मतदारांना आवाहन करीत असल्याचे सांगितले. हा सर्व प्रतिसाद पाहून महापौर संदीप जोशी यांनी भावुक होत सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार मानले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145