Published On : Fri, Aug 28th, 2020

देश, समाज, गरीब यांच्यासाठी काम करण्यास प्राधान्य : नितीन गडकरी

विश्व सिंधी सेवा संगम पदाधिकार्‍यांशी संवाद

नागपूर: देशातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या भागाच्या विकासासाठी आपण काम केले पाहिजे. देश, समाज, गरीब यांच्यासाठी काम करण्यास मी प्राधान्य दिले आहे. आपल्या कामांना जनतेची पावती मिळाली पाहिजे असे काम आपल्या हातून झाले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

विश्व सिंधी सेवा संगमच्या पदाधिकार्‍यांशी ना. गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. उद्योजकतेत सिंधी समाजाचे खूप प्रगती केली आहे, असे सांगताना एका प्रश्नाच्या उत्तरात ना. गडकरी म्हणाले- महामार्ग बांधणीमध्ये एवढे काम देशात झाले आहे की येत्या दोन वर्षात युरोपसारखे मार्ग देशात पाहायला मिळतील. याशिवाय मुंबई-दिल्ली हा राष्ट्रीय हरित महामार्ग 12 पदरी सिमेंट रस्ता बांधला जात आहे.


याशिवाय 22 हरित महामार्ग आम्ही बनवत आहोत. वाराणसी हल्दीया हा 1300 किमीचा जलमार्ग आम्ही पूर्ण केला आहे. अलाहाबाद ते वाराणसी हा जलमार्गही पूर्ण झाला आहे. सिंधी समाजातील परदेशात असलेल्या उद्योजकांनी तेथील तंत्रज्ञान येथे आणून, विविध डिझाईन आणून येथे संशोधन व तंत्रज्ञान विकसित करून देशाची निर्यात वाढवावी, असेही ते म्हणाले.

हरित राष्ट्रीय महामार्ग बांधताना झाडांची कटाई आता होणार नाही, झाडांचे प्रत्यारोपण करण्याचे निर्देश आपण दिले असल्याचे सांगताना ना. गडकरी यांनी सांगितले की, विविध तंत्रज्ञानाचा विकास करणे आता शक्य आहे. हरित तंत्रज्ञानाचा उपयोग महामार्ग निर्मिती करताना करणार. जेथे झाडेच नाही तेथे बांबू लावणार. कारण बांबू आमच्या रोजगाराचे साधन होऊ शकतो. कृषी क्षेत्राला जैविक इंधनाच्या क्षेत्रात परिवर्तित करणे आता आवश्यक झाले आहे.

धानाच्या तणसापासून बायो सीएनजी बनविण्याचे तंत्रज्ञान आणले आहे, त्याचा उपयोग केला तर रोजगार निर्मिती होऊ शकते. नवीन संशोधन, उद्योजकता, विज्ञान, कौशल्य, यशस्वी प्रयोग हेच ज्ञान आहे. या ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करता आले पाहिजे. आपल्या देशातही विविध प्रकारचे संशोधन केले जात आहे. त्याला प्रोत्साहन देणे आमचे काम आहे. रोजगार निर्मिती ही आमच्या अर्थव्यवस्थेची प्राथमिकता आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास, कृषी मालावर आधारित उद्योग, मागास भागाचा विकास, गरीबांचा विकास, हाच आत्मनिर्भरतेचा मार्ग आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.