Published On : Mon, Jul 8th, 2019

शहर स्वच्छ व निरोगी ठेवण्यास प्राधान्य – सभापती वीरेंद्र कुकरेजा

Advertisement

वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापतीचा पदभार स्वीकारला

नागपूर : नागपूर शहर हे स्वच्छ व निरोगी राहील याचा विचार प्राधान्याने केल्या जाईल. शहरात कुठेही अस्वच्छता राहणार नाही, नागरिकांच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल, असा विश्वास नवनिर्वाचित आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती म्हणून वीरेंद्र कुकरेजा यांनी सोमवारी (ता.८) पदभार स्वीकारला. याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार प्रा.अनिल सोले, उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, उपसभापती नागेश सहारे, कर व कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, आरोग्य समिती सदस्या विशाखा बांते, सदस्य लहुकुमार बेहेते, अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे सभापती ॲड.संजय बालपांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना वीरेंद्र कुकरेजा म्हणाले, नागपूर शहर हे दिवसेंदिवस प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. शहरात आरोग्यविषयक व स्वच्छतेसंदर्भात अनेक समस्या आहे. या सर्व समस्या गांभीर्याने सोडविण्याचा माझा प्रयत्न असेल. महापालिकेत काम करताना आरोग्य विभागाच्या व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून हे काम शक्य आहे. त्यामुळे प्रशासन या कामात मला सहकार्य करेलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला, तो मी सार्थ करून दाखवीन असे म्हणत त्यांनी मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

आमदार प्रा.अनिल सोले यांनी बाजारपेठेमध्ये सार्वजनिक शैचालय असावे अशी सूचना आपल्या भाषणादरम्यान केली. आमदार डॉ.मिलिंद माने यांनीही आपल्या भाषणातून नवनिर्वाचित सभापती वीरेंद्र कुकरेजा यांना शुभेच्छा दिल्या तसेच डॉक्टर्सना नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी काय कार्यवाही करता येईल, याबाबत विचार करण्यात यावा, असे ते म्हणाले. सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी वीरेंद्र कुकरेजा यांचे अभिनंदन करत स्थायी समिती सभापती म्हणून श्री.कुकरेजा यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला.

अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागपूर महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती व परिवहन समिती नंतर महत्वाची समिती म्हणजे आरोग्य समिती आहे. त्या समितीचा सभापती म्हणून एक जबाबदार व कर्तव्यदक्ष सभापती मिळालेला आहे. प्रशासन व पदाधिकारी यांच्या समन्वयातूनच लोकप्रतिनिधी कार्य करत असतो. या समितीपुढील आव्हाने खूप मोठी आहेत. सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या आरोग्याच्या समस्या सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. या सर्व समस्या नवे सभापती सोडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन व आभार नगरसेविका दिव्या धुरडे यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, महिला व बालकल्याण समिती सभापती संगिता गिऱ्हे, धंतोली झोन सभापती लता काडगाये, शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक महेंद्र धनविजय, निशांत गांधी, महेंद्र धनविजय, नगरसेविका प्रमिला मंथरानी, प्रगती पाटील, सुषमा चौधरी, उज्ज्वला शर्मा, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबेळे, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ.सरिता कामदार, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, भाजपा संघटनमंत्री भोजराज डुंबे, घनश्यामदास कुकरेजा, राखी कुकरेजा, डॉ. विंकी रूगवानी, प्रताप मोटवानी, अर्जूनदास आहूजा प्रामुख्याने उपस्थित होते.

विविध संघटनेतर्फे वीरेंद्र कुकरेजा यांचा सत्कार

नवनिर्वाचित वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती म्हणून वीरेंद्र कुकरेजा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील विविध संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बेझनबाग नागरी कृती समितीचे अशोक कोल्हटकर, अशोक पानतावने, सुधीर जांभुळकर, सिंधी समाज, आहुजा परिवार, संत बाबा हरदास मंडळ, गड्डी गोदाम दुकानदार संघ, क्रेडाई या संस्थांचा समावेश होता.