Published On : Tue, Jul 25th, 2017

सार्वजनिक वाहतुकीत स्वच्छतेला प्राधान्य : आ. कृष्णा खोपडे

Advertisement


नागपूर:
नागपूर शहर आता बदलत आहे. ‘स्मार्ट शहरा’च्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूकही आता ‘स्मार्ट’ होत आहे. शहर बसमध्ये स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठीच आता स्वयंचलित बस स्वच्छता यंत्र सेवेत दाखल झाले असून यामुळे ‘आपली बस स्वच्छ बस’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही, असे प्रतिपादन आमदार कृष्णा खोपडे यांनी केले.

परिवहन विभाग व आर.के. सिटी बस ऑपरेटर यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या स्वयंचलित बस सफाई यंत्राच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना सभापती बंटी कुकडे म्हणाले, नागपूर शहरातील प्रत्येक नागरिकासाठी सार्वजनिक वाहतूक सोयीची करू. ‘आपली बस’ ही अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असेल. इतकेच नव्हे तर प्रत्येक बसच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष असेल. नागरिकांना खऱ्या अर्थाने ही बस आपली हक्काची बस वाटायला हवी, असेही ते म्हणाले.


कार्यक्रमाला आर.के.सिटी.बस ऑपरेटर्सचे व्यवस्थापकीय संचालक नीलमनी गुप्ता, संचालक मनोहरलाल कथेरिया, परिवहन विभागाचे योगेश लुंगे, संजय मोहले, प्रवीण सरोदे, आदित्य छाजेड, सी.पी.तिवारी, दीपक मगर, परिवहन विभागाचे कर्मचारी व ऑपरेटर्स उपस्थित होते.