Published On : Thu, Jan 25th, 2018

नागपूरचे सुनील महाडिक व पांडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक

Mahadik
नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दशरथ महाडिक आणि वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक माताप्रसाद पांडे यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.

सुनील महाडिक हे कृषी पदवीधर असून, ते मूळचे उक्कडगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर येथील रहिवासी आहेत. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ग्रामीण भागात शिक्षण झाले. कधी काळी दुष्काळी रोजगार हमी योजनेवर मजुरी करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. १९९६ साली पदवी पूर्ण झाल्यानंतर ते तात्काळ सरळ सेवा पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले.

त्यांनी आतापर्यंत मुंबई, सांगली, विशेष, सुरक्षा पथक, गुन्हे अन्वेषण विभाग आणि गेल्या चार वर्षांपासून एमआयडीसी पोलीस ठाण्यातील जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना आतापर्यंतच्या गोपनीय अहवालात अतिउत्कृष्ट शेरे मिळालेले आहेत. त्यांनी सातशेवर पुरस्कार मिळविले आहेत. गुन्हे अन्वेषण आणि प्रकटीकरण यासाठी बहुतांश पुरस्कार मिळाले आहेत. त्याचप्रकारे माताप्रसाद पांडे हे मूळचे उत्तर प्रदेशातील अमेठीचे रहिवासी आहेत. ते १९७९ मध्ये शिपाई म्हणून शहर पोलिसात दाखल झाले. त्यांनी वाहतूक शाखा, गुन्हे शाखा, विशेष शाखेसह अनेक ठिकाणी काम केले. सध्या ते वाहतूक शाखेत कार्यरत आहेत.