नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनमध्ये कायदेशीर बाबींमध्ये सल्ला देण्यासाठी विधी सहायकांच्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती प्रस्तावाला विधी समितीने मंजुरी दिली.
विधी समितीच्या सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात झालेल्या बैठकीला समिती सदस्य महेश महाजन, अमर बागडे, हर्षला साबळे, समिता चकोले, व्यंकटेश कपले, सहायक अभियोक्ता सूरज पारोचे व संबंधित विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. सदर बैठकीत माजी महापौर व नगरसेवक प्रवीण दटके यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या प्रश्नाबाबत अनुकंपा तत्त्वावर विवाहित मुलींच्या संदर्भात नियमात झालेल्या सुधारणांची त्याचप्रमाणे इतरही अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसंबंधीच्या धोरणातील तरतुदीसंदर्भात चर्चा करण्यात आली.
नगरसेवक बंटी शेळके यांनी महानगरपालिकेतील व खासगी कंत्राटदारांकडून नियुक्ती करण्यामध्ये झालेल्या अनियमिततेबद्दल मनपाच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न विचारण्यात आला होता. या विषयावरही विधी समितीच्या अभिप्रायासाठी चर्चा करण्यात आली. या दोन्ही विषयावर सामान्य प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांनी आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे यांनी दिले. महानगरपालिकेच्या अधिनियमातील तरतुदीसंबंधात नागपुरातील नामवंत कायदे तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन व्हावे या हेतूने नगरसेवकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देशही सभापती ॲड. तेलगोटे यांनी दिले.
