Published On : Tue, Aug 29th, 2017

राष्ट्रपती दीक्षाभूमी व स्मृती भवनला भेट देणार?

Advertisement

नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद लवकरच नागपूर दौºयावर येणार आहेत. दौºयाप्रंसगी ते दीक्षाभूमी व रेशीमबाग येथील स्मृती भवनला भेट देतील. तसेच रेशीमबाग येथे महापालिकेने उभारलेल्या सुरेश भट सभागृहाचे त्यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेने राष्ट्रपती कार्यालयाला पत्र पाठवून सुरेश भट सभागृहाच्या लोकार्पण समारंभासाठी राष्ट्रपतींना निमंत्रित केले आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून यासाठी संमती मिळेल असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. महापालिका प्रशासनानेही याला दुजोरा दिला असून सप्टेंबर महिन्यात राष्ट्रपतींचा दौरा निश्चित होण्याची आशा आहे.

रामनाथ कोविंद यांनी यापूर्वी दीक्षाभूमीला भेट दिली आहे. परंतु राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ते प्रथमच नागपूरला येणार आहेत. पदाधिकारी व प्रशासनस्तरावर या संदर्भात पाठपुरावा सुरू आहे. मात्र राष्ट्रपती कार्यालयाकडून अद्याप होकार मिळाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे १३ आॅगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण होणार होते. या दृष्टीने महापालिकेने तयारी सुरू केली होती. परंतु हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.