
नागपूर : समाजाने आपला इतिहास विसरू नये, कारण इतिहासापासून दूर गेल्यावरच गुलामगिरीचे सावट आपल्यावर आले होते. परिवर्तन घडवून आणणाऱ्या थोर व्यक्तींच्या कार्याची नोंद ठेवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उत्तर अंबाझरी मार्गावरील अनसूयाबाई काळे स्मृती सदन आणि पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या वर्किंग वूमन अँड गर्ल्स होस्टेलच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन त्यांनी १५ नोव्हेंबर रोजी केले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला अँम्परसँड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रुस्तम केरावाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
जातीयतेविरोधातील लढ्यात आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या अनसूयाबाई काळेंचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “महिलांसाठी समान संधी, स्वावलंबन आणि प्रतिष्ठा यांसाठी त्यांनी लढा दिला. त्यांचे विचार प्रगत, सुधारक आणि सामाजिक परिवर्तनाला चालना देणारे होते.” देशाच्या पहिल्या लोकसभेत नागपूरचे प्रतिनिधित्व करण्याचा मान अनसूयाबाईंना मिळाला होता, हे त्यांनी विशेषत्वाने सांगितले.
नागपूरने अनेक थोर व्यक्तिमत्त्वे पाहिली; त्यापैकी अनसूयाबाई एक तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांनी महिलांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी आयुष्य वेचले आणि समाजाला नवे भान दिले, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला काळे फाऊंडेशन ट्रस्टचे विश्वस्त विलास काळे यांनी अनसूयाबाईंच्या कार्याचा आढावा घेतला. व्यासपीठावर एआयडब्ल्यूसीच्या माजी अध्यक्षा शीला काकडे, पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या अध्यक्षा नीलिमा शुक्ला आणि सचिव नीला कर्णिक उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता कौशिक यांनी केले, तर आभार अनसूया काळे–छाबरानी यांनी मानले.
नाटकाच्या सरावाची आठवण-
या इमारतीशी जोडलेली जुनी आठवण सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, “लहानपणी अनेकदा इथे आलो. नाटकाच्या सरावासाठीही या ठिकाणी येण्याचा योग आला होता. अलीकडे इमारतीची अवस्था खराब झाली होती, त्यामुळे नूतनीकरणाचा प्रस्ताव येताच आम्ही तातडीने मंजुरी दिली.”
या नव्या रूपातील स्मृती सदनातून अनसूयाबाईंचा विचारवारसा अधिक प्रभावीपणे पुढे नेला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.











