Published On : Mon, Feb 24th, 2020

नागार्जुनाचा इतिहास सुरक्षित ठेवा

Advertisement

नागपूर: आयुर्वेद आणि रसायनाचे जनक बोधिसत्व नागार्जुन यांनी आयुष्यभर बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार केला. उत्खननात नागार्जुनाचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळल्याने या टेकडीला देशातच नव्हे, तर जगभरात विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच टेकडीचे जतन करून नागार्जुनाचा इतिहास सुरक्षित ठेवावा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म गुरू व धम्म सेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले.

अखिल भारतीय धम्म सेना भिक्षू महासंघ आणि उपासक, उपासिका संघातर्फे बोधिसत्व नागार्जुन बौद्ध महोत्सवाचे आयोजन शुक्रवार २१ फेब्रुवारी रोजी बोधिसत्व नागार्जुन महाविहार, नागार्जुन टेकडी येथे आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ससाई बोलत होते.

बोधिसत्व नागार्जुन टेकडीच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात २५ फूट उंच बोधिसत्व नागार्जुन यांचा पुतळा व महाविहार तयार करण्यात आले आहे. या नागार्जुन टेकडीच्या संरक्षणासाठी संघर्ष दिन पाळण्यात येतो. महोत्सवाच्या सुरुवातीला तथागत बुद्ध आणि भीमगीते सादर करण्यात आली. यावेळी बोधिसत्व नागार्जुन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला.

भंते नागवंशी म्हणाले की, बोधिसत्व नागर्जुन यांना दुसरे बुद्ध मानले जाते. त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी रामटेक येथील नागार्जुन टेकडी राहिली आहे. त्यांनी लावलेल्या आयुर्वेद वनस्पतीमुळे संपूर्ण परिसरच औषधीमय झाला.

त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आयुर्वेदाला आज जगात महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळ्याप्रसंगी नागार्जुन टेकडीचा आवर्जून उल्लेख केला होता. नागपूर ही नागवंशीयांची भूमी आहे. नागवंशीयांनीच बुद्धाचा धम्म भारतभर पसरवला, असा बाबासाहेबांनी आपल्या भाषणात उल्लेख केल्याचे ते म्हणाले. यावेळी भंते धम्मसारथी यांनीही बोधिसत्व नागार्जुन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. या ऐतिहासिक टेकडीचे महत्त्व मौर्य काळापासून असून या टेकडीवर नागार्जुन समाधी, स्मारक, नागार्जुन गुंफा, आयुर्वेद, रसायन प्रयोगशाळेचे खंडित अवशेष, आयुर्वेदिक वनसंपदा आजही अस्तित्वात आहे. यावेळी उपस्थित उपासक आणि उपासिकांनी नागर्जुन यांच्या समाधीचे दर्शन घेतले. कार्यक्रमाला हजारोंची गर्दी होती.