नागपूर: शहरातील ऐतिहासिक गांधीसागर तलावाचा कायापालट करण्यात येणार आहे. प्रस्तावित सौंदर्यीकरणाचे सादरीकरण प्रशासनाने महापौर नंदा जिचकार यांच्यासमोर मंगळवारी (ता.१३) मनपा मुख्यालयातील महापौर कार्यालयात केले.
यावेळी माजी महापौर प्रवीण दटके, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, अग्निशमन समिती उपसभापती व मनपातील उपनेत्या वर्षा ठाकरे, धंतोली झोन सभापती प्रमोद चिखले, शहर अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजीव जैस्वाल, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, उद्यान अधीक्षक धनंजय मेंडूलकर, धंतोली झोन सहायक आयुक्त स्मिता काळे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आर्किर्टेक संदीप जोशी यांनी तलावाच्या सभोवताल व तलावामध्ये करण्यात येणा-या सौदंर्यीकरणाविषयी माहिती दिली. तलावाच्या सभोवताल मजबूत संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. तलावातील गाळ काढण्यात येणार असून तलावामध्ये म्युझिकल फाऊंटेन, लाईट आणि साऊंड शो तयार करण्यात येणार असल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली. तलावानजिक असलेल्या उद्यानांचेही सौदंर्यीकरण करण्यात येणार आहे. उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग झोन तयार करण्यात येणार आहे. तलावाच्या सभोवताल असलेले मंदिरांचेही सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गांधीसागर तलावाच्या बाजूला बालभवन तयार करण्यात येणार आहे. बालभवनाच्या तळघरात पार्किंगसाठी जागा करण्याचा प्रस्ताव आहे. बालभवन तयार करताना लहान मुलांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींचा तेथे वापर व्हावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. तसेच, तलावाचे सौंदर्यीकरण करताना नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात यावी, असे निर्देश महापौरांनी दिले. सौंदर्यीकरण करताना त्यात रेन वॉटर हार्वेंस्टिंग, सोलार सिस्टीम, ग्रीन बिल्डिंगचा वापर करण्यात यावा, असेही त्यांनी सूचित केले.