Published On : Thu, May 25th, 2017

फुले मार्केटला ‘स्मार्ट बाजार’ करण्याचा आराखडा तयार करा : महापौर

Advertisement


नागपूर:
फुले मार्केट येथील भाजी मंडी परिसराला महापौर नंदा जिचकार आणि आय़ुक्त अश्विन मुदगल यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, धंतोली झोन सभापती प्रमोद चिखले, नगरसेवक हर्षदा साबळे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, धंतोली झोन सहायक आय़ुक्त गणेश राठोड उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी कॉटन मार्केटला आग लागली होती. त्यात तब्बल ४२ दुकाने जळून खाक झालीत. त्यात लाखो रूपयांचे नुकसान झाले. महापौर नंदा जिचकार व आयुक्त अश्विन मुदगल यांनी नुकसान झालेल्या दुकानांची पहाणी करून व्यापाऱ्यांशी चर्चा केली. चर्चेत असे निदर्शनास आले की सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतरच फुले मार्केटमध्ये कार्यवाही करण्यात येईल. तत्पूर्वी फुले मार्केटमध्ये नागरी सुविधा, साफसफाई, पाणी पुरवठा करण्याचे निर्देश आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिलेत. भविष्यात आगीवर नियंत्रण मिळविता यावे, यासाठी जागोजागी हॅड्रन्ट बसविण्यात यावे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. फुले मार्केटची इमारत ही जुनी असून ती आता मोडकळीस येण्याच्या मार्गावर आहे. त्याची डागडूजी करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवू,असे आश्वासन यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

आगीत नुकसान झालेल्या दुकानदारांना भरपाईसाठी महानगरपालिकेने शासनाला पत्र पाठवावे, अशी मागणी तेथील व्यापारी वर्गाने केली आहे. दुकानदारांच्या या मागणीबाबत कार्यवाही करू जेणे करून जिल्हाधिकारी कार्यालयात शिफारस करण्यात येईल असे आश्वासन आय़ुक्त मुदगल य़ांनी यावेळी दिले. तेथील विजेचा पुरवठा, पाणी पुरवठा सुरू करून समस्या त्वरित निकाली काढण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक करून लवकरात लवकर तोडगा काढू, असेही ते म्हणाले.


यावेळी महात्मा फुले समितीतर्फे व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन महापौर व आयुक्तांना दिले. या पाहणीप्रसंगी महात्मा फुले बाजार समितीचे अध्यक्ष शेख हुसेन, माजी नगरसेवक रमण पैगवार, मनोज साबळे, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, जम्मु आनंद आदी उपस्थित होते.