Published On : Sat, Oct 6th, 2018

शहरातील सुख, समृद्धीसाठी क्रीडा समिती सभापतींची ताजबागमध्ये प्रार्थना

नागपूर : सद्या शहरात असलेले डेंग्यू, स्क्रब टायफस व विविध आजारांचे थैमान असून यापासून नागरिकांवरील येणारे संकट टळावे व सर्वत्र सुख समृद्धी नांदावी यासाठी मनपाचे क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी ताजबाज येथे प्रार्थना केली. संत ताजुद्दीन बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त ऊर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त नागेश सहारे यांनी ताजबाग येथे भेट देउन चादर चढविली.

शहरातील नागरिक सद्याच्या विविध अडचणींचा सामना करीत आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी मनपाकडून सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. संत ताजुद्दीन बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ऊर्ससाठी ताजबागमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव प्रार्थनेसाठी येतात. अशा स्थितीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्यांचे विविध आजारांपासून संरक्षण व्हावे, यंदाचे ऊर्स शांततेत पार पडावे व सर्व शहरवासीयांचे आरोग्य सुदृढ राखले जावे, यासाठी क्रीडा समिती सभापतींनी संत ताजुद्दीनबाबांच्या समाधीला अभिवादन केले. यावेळी प्रभाग अध्यक्ष जाकीर भाई, कह्यूम अंसारी, छोटे साहब, तोसिफ अहमद, बाबा सैफुद्दीन आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

ताजबाग ऊर्ससाठी महानगरपालिकेतर्फे स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात येत असून नागरिकांनी परिसरात स्वच्छता राखावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.