Published On : Sat, Sep 5th, 2020

शहरातील प्रसिद्ध बंदूक व्यवसायिक प्रमोद जोसेफ यांचे निधन

Advertisement

– मध्य भारतातील एकमेव दुरुस्ती केंद्राचे संचालक

नागपूर : भारतातील एकमेव असलेल्या नागपुरातील कॉटन मार्केट, सुभाष रोड स्थित ‘जोसेफ अँड सन्स गन रिपेअर’चे संचालक प्रमोद जोसेफ (तायडे) यांचे अल्पशा आजाराने आज शनिवारी निधन झाले.

मध्य भारतातील ते एक प्रसिद्ध बंदूक रिपेअर होते, सर्व प्रकारच्या बंदुकी, पिस्टल, रिव्हॉल्व्हर दुरुस्त करण्यात त्यांचा हातखंडा होता. प्रमोद जोसेफ यांचे वडील जोसेफ कॉसमस (महादेव) यांनी सेंट जोसेफ टेक्निकल स्कुल येथून बंदूक दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी १९६० मध्ये प्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवी बाबुराव धनवटे यांच्या सहकार्याने सुभाष रोडवरील गीता मंदिर कॉम्प्लेक्समध्ये दुकान थाटले होते. दरम्यान १९८० मध्ये वडील जोसेफ कॉसमस यांचे निधन झाले. त्यानंतर बरेच वर्ष दुकान बंद राहिले.

वडिलांच्या मृत्यूनंतर जुन्या बंदुकीचा अभ्यास करून प्रमोद जोसेफ यांनी दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले. खाजगीसह शासकीय सुरक्षा कंपनीच्या, तसेच शहरातील नामांकित व्यक्तीच्या आत्मसंरक्षणासाठी वापरण्यात येणारे अग्निशसस्त्र ते दुरुस्त करायचे.

यामध्ये मेड इन अमेरिका, जर्मनी, बरमिंगन, इटली आदी देशातील बनावटीचे रिव्हॉल्व्हर, पिस्टल, बंदूकचा समावेश होता. प्रमोद जोसेफ काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन भाऊ, वहिनी व पुतण्या असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी १२.३० च्या सुमारास जरीपटका ख्रिश्चन कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.