मुंबई : झोपडपट्ट्या मधील अधिकृत चाळींच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या राहिवाश्यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून घरे देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी अधिकाऱ्यांना दिले.
आज मंत्रालयात चाळींच्या पहिल्या मजल्यावरील राहिवाश्यांच्या मागण्या संदर्भात बैठक झाली. त्यावेळी श्री.महेता यांनी निर्देश देऊन झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा आढावा घेतला.
श्री. महेता यांनी सांगितले, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या ऑनलाइन यंत्रणेचे काम पूर्ण करावे. सर्व माहिती अपडेट करून सुरू असलेली कामे तातडीने मार्गी लावावी. यावेळी त्यांनी बायोमेट्रिक सर्वेक्षण, प्रधानमंत्री आवास योजना, मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास या बाबतचाही आढावा घेतला.
या बैठकीला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजीव कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर, मुंबई क्षेत्र विकास व गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

